नाशिक महापालिकेला आगाऊपणा नडला... सामूहिक कन्यापूजन कार्यक्रम...

Share:
Main Image
Last updated: 17-Oct-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ ऑक्टोबर - 'द आर्ट ऑफ लिविंग', वैदिक धर्म संस्थान महाराष्ट्र आणि नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेला ‘सामूहिक कन्यापूजन व होम हवन’ कार्यक्रम अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) आक्षेपानंतर रद्द करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अंनिसने यावर कठोर आक्षेप नोंदवत प्रशासनाला धारेवर धरल्याने हा निर्णय घेण्यात आला.

नेमके प्रकरण काय?

नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता नाशिकच्या एका मध्यवर्ती ठिकाणी शाळेच्या वेळेत विद्यार्थिनींना सामूहिक कन्यापूजनासाठी आणण्याचे आवाहन करणारे पत्र ‘प्रसाद पिंपळे, समन्वयक कन्या पूजन सोहळा’ यांच्या सहीने नाशिक महानगरपालिकेच्या सर्व मुख्याध्यापक व मुख्याध्यापिकांना पाठवण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक-शिक्षिकांनीही सहभागी व्हावे, असे त्यात नमूद केले होते.

हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच हे पत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या हाती लागले.

अंनिसचा तीव्र आक्षेप आणि प्रशासनाची धडक कारवाई

Advertisement

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी तात्काळ नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराबद्दल जा विचारणा केली.

यावेळी डॉ. गोराणे यांनी, "भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या मूलभूत मूल्याशी हा धार्मिक व कर्मकांडात्मक कार्यक्रम पूर्णपणे विसंगत आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, या वयात विद्यार्थ्यांना अशा गोष्टींमध्ये गुंतवणे त्यांच्या बौद्धिक विकासासाठी बाधक ठरू शकते," अशी ठाम भूमिका मांडली. मुलींना सध्या कर्मकांडापेक्षा सुरक्षेची आणि सन्मानाची अधिक गरज आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

अंनिसच्या या युक्तिवादाची गंभीर दखल घेत शिक्षण अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी तत्काळ हा सामुदायिक कन्यापूजन व होमाचा कार्यक्रम रद्द करीत असल्याचे जाहीर केले. तसेच, या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी जाऊ नये, अशा आशयाचा लेखी आदेश (संदेश) सर्व संबंधित शाळांना तात्काळ पाठवण्यात आला.

अंनिसची भूमिका स्पष्ट

एखाद्या धार्मिक संघटनेच्या प्रतिनिधीच्या पत्रावरून सरसकट शाळांच्या वेळेत अशा प्रकारचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे चुकीचे असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे. यासंदर्भात बोलताना डॉ. टी. आर. गोराणे व कृष्णा चांदगुडे यांनी स्पष्ट केले की, "आमचा देव, धर्म, अध्यात्म, श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अजिबात विरोध नाही. मात्र, शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांमध्ये अवैज्ञानिक कर्मकांडे रुजवणे आणि त्यातून त्यांचे शोषण होणे योग्य नाही."

Comments

No comments yet.