राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ऑक्टोबरपासून ही विशेष मोहीम... राज्य सरकारचे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 17-Oct-2026

 

मुंबई, (प्रतिनिधी) १७ ऑक्टोबर - राज्यातील सर्व शाळांमध्ये आगामी १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून शाळांची स्वच्छता, सुशोभीकरण व देखभाल करून शैक्षणिक वातावरण अधिक पोषक करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. 

मोहिमेचा उद्देश व दोन टप्प्यांमधील नियोजन

शाळा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तीची भावना रुजविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे: 

पहिला टप्पा (१८ ते २४ ऑक्टोबर): प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची विशेष बैठक घेऊन शिक्षक, पालक व ग्रामस्थांचा सहभाग निश्चित केला जाईल. वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वच्छतागृहे आणि क्रीडांगणाची पाहणी करून स्वच्छता व दुरुस्तीचा कृती आराखडा तयार केला जाईल. 

दूसरा टप्पा (२५ ते ३१ ऑक्टोबर): या कालावधीत प्रत्यक्ष कामे केली जातील. वर्गखोल्या, फरशी, भिंती, दरवाजे, खिडक्या आणि पंख्यांची सखोल साफसफाई केली जाईल. तसेच स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, परिसर आणि क्रीडांगण स्वच्छ करून कचरा वर्गीकरणाची व्यवस्था केली जाईल. डास व कीटकजन्य समस्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. 

Advertisement

किरकोळ दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांकडून वर्गणी न घेण्याचे स्पष्ट निर्देश

मोहिमेदरम्यान विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, फर्निचर, दरवाजे व खिडक्यांची पाहणी करून आवश्यक किरकोळ दुरुस्ती व देखभाल केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक विद्युत जोडण्या आणि असुरक्षित भागांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

या मोहिमेवरील सर्व खर्च शाळांना 'समग्र शिक्षा' योजनेंतर्गत मिळणाऱ्या एकत्रित अनुदानातूनच केला जाईल. विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची अनिवार्य आर्थिक वर्गणी किंवा निधी गोळा करता येणार नाही, अशा सक्त सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

'माझी शाळा-माझी जबाबदारी' भावना

'माझी शाळा-माझी जबाबदारी' या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि सीएसआरचा सक्रिय सहभाग घेतला जाणार असून, मोहिमेच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.

 

Comments

No comments yet.