धुळ्यात मोठी कारवाई... अभयारण्यात केला हा गंभीर उद्योग... असा झाला पर्दाफाश...

Share:
Main Image
Last updated: 17-Oct-2026

 

धुळे, (प्रतिनिधी) १७ ऑक्टोबर - महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईत धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महसूल गुप्तचार संचालनालयाला (DRI) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, डी.आर.आय. आणि केंद्रीय अंमली पदार्थ ब्युरो (CBN) यांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जामनियापाणी गावाजवळील वन्यजीव अभयारण्यात सुरू असलेली अवैध गांजाची लागवड पूर्णपणे नष्ट केली आहे.

अतिदुर्गम भागात होती अवैध लागवड

डी.आर.आय. आणि सीबीएनच्या पथकाने १४ ऑक्टोबर रोजी संबंधित अभयारण्यातील ठरविक ठिकाणाला भेट देऊन ही कारवाई केली. या पथकाला अभयारण्यातील अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलाच्या भागात तब्बल पाच वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदा गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले.

Advertisement

एकूण २.८७ हेक्टर (म्हणजेच ७.०८ एक्कर) एवढ्या मोठ्या क्षेत्रावर हे अवैध पीक पसरले होते. या मोहिमेत दुर्गम भूप्रदेश, वन्यप्राण्यांचा असलेला धोका आणि मोबाईल नेटवर्कचा पूर्ण अभाव यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण खबरदारी आणि आवश्यक सुरक्षा बाळगून ही मोहीम यशस्वीरीत्या फत्ते केली.

पोलिसांच्या उपस्थितीत पीक नष्ट

या कारवाईदरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'रोटाव्हेटर' या आधुनिक कृषी यंत्राचा वापर करून संपूर्ण गांजाचे पीक ट्रॅक्टरच्या साहाय्याने जाळून व नष्ट करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

अंमली पदार्थांच्या बेकायदा व्यापाराविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आणि देशाला अंमली पदार्थमुक्त व सुरक्षित बनवण्यासाठी देशभरात अशा प्रकारे अवैध पिके नष्ट करण्याची मोहीम डी.आर.आय. आणि सीबीएनद्वारे सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे.

 

Comments

No comments yet.