मुलांची शाळेत ॲडमिशन घेताय? राज्य सरकारने काढलेला हा आदेश आधी वाचा...

Share:
Main Image
Last updated: 17-Oct-2026

 

मुंबई, (प्रतिनिधी) १७ ऑक्टोबर - राज्यातील शाळांमध्ये पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यात आलेले आहे. हे वय ३० जून रोजी पूर्ण असणे आवश्यक असून, नवीन निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.

वयाचे नवीन निकष आणि लागू होणारी वर्षे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील तरतुदींनुसार राज्य शासनाने हे वयाचे निकष निश्चित केले आहेत. केंद्र शासनानेही इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षांपेक्षा अधिक असावे, असे कळविले होते. यानुसार विविध वर्गांसाठी पुढीलप्रमाणे वयोमर्यादा लागू राहील:

बालवाटिका-१ (नर्सरी): तीन वर्षे पूर्ण असण्याचा निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून लागू होईल.

बालवाटिका-२ (ज्युनिअर के.जी.): चार वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०२८-२९ पासून लागू होईल.

बालवाटिका-३ (सिनिअर के.जी.): पाच वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०२९-३० पासून लागू होईल.

Advertisement

इयत्ता पहिली: सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०३०-३१ पासून लागू होईल.

सध्याच्या विद्यार्थ्यांना सूट आणि १५ दिवसांची विशेष सवलत

यापूर्वी राज्यात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये (उदा. राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी) इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळे दिनांक ग्राह्य धरले जात होते, तसेच पूर्व-प्राथमिक वर्गांसाठी वयाची कोणतीही निश्चित अट नव्हती. मात्र, नवीन निर्णयनुसार काही महत्त्वपूर्ण सवलती देण्यात आल्या आहेत:

विद्यमान विद्यार्थ्यांना सूट: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यमान विद्यार्थ्यांना नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत.

नियमित विद्यार्थ्यांना सूट: कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांनाही पुढील उच्च वर्गात प्रवेश देताना वयाचे निकष लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

वयात सवलत: पूर्व-प्राथमिक वर्गातील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देता येईल.

पायाभूत वर्गांतील नामांकन आणि प्रवेशासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या नवीन वयोमर्यादेनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

 

Comments

No comments yet.