नाशिक (प्रतिनिधी), १६ ऑक्टोबर २०२६ -
चमत्काराचा दावा करत आणि मंत्रसिद्धीच्या नावाखाली पाच पैशांचा काळा धागा तब्बल ९०० रुपयांना विकणाऱ्या एका प्रख्यात ज्योतिषाचे पितळ उघडे पडले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) आक्रमक भूमिकेन्यानंतर या ज्योतिषाने पंचवटी पोलीस ठाण्यात सफशेल माघार घेत माफीनामा लिहून दिला आहे. या कारवाईमुळे अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या भोंदूबाबांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय होती?
शहरातील पंचवटी परिसरातील एक ज्योतिषी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नवरात्रीच्या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक जाहिरात व स्टेटस ठेवले होते.
यामध्ये, "मंत्रसिद्धी केलेला काळा धागा उजव्या मनगटावर बांधल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि प्रत्येक कार्यसिद्धी होते," असा अंधश्रद्धा पसरवणारा दावा त्याने केला होता.
एवढेच नव्हे तर, अनेकांना यामुळे गुण आल्याचे खोटे पुरावेही त्याने व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवून नागरिकांची फसवणूक चालवली होती.
अंनिसची आक्रमक भूमिका आणि पोलिसांत तक्रार
हा प्रकार समोर आल्यानंतर ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या कृत्याविरोधात अंनिसने पोलिसांत निवेदन दिले आणि उघडपणे अशी मंत्रशक्ती सिद्ध करण्याचे आव्हानही दिले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी संबंधित ज्योतिषाला पोलीस ठाण्यात बोलावले.
पोलिसांनी त्याचे बँक खाते आणि इतर व्यवहारांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान ज्योतिषाचे हे कृत्य गुन्ह्याच्या स्वरूपाचे असल्याचे निष्पन्न झाले.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून समुपदेशन आणि माफीनामा
पोलीस ठाण्यात अंनिसचे कार्यकर्ते, पोलीस अधिकारी आणि संबंधित ज्योतिषी यांच्यात समोरासमोर चर्चा झाली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचे समुपदेशन केले.
अखेर आपण व्यवसाय वाढवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्याचे ज्योतिषाने मान्य केले.
पुढे असे कोणतेही अंधश्रद्धायुक्त कृत्य करणार नाही, अशी लिखित कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. तसेच, अंनिसच्या वतीने त्याला ‘फलज्योतिष हे शास्त्र असल्याचे विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करा आणि २१ लाख रुपयांचे बक्षीस जिंका’ असे आव्हानही देण्यात आले होते, ज्यामध्ये त्याने पूर्णपणे माघार घेतली.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
या संपूर्ण कारवाईदरम्यान अंनिसचे कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्री, प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे आणि रंजन लोंढे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
"फलज्योतिष हे थोतांड असून ती स्वप्न विकण्याची कला आहे. फलज्योतिष जरी कायद्याच्या कक्षेत नसले, तरी अनेक ज्योतिषी गुन्हा ठरतील अशा अंधश्रद्धायुक्त कृती करत असतात.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रत्येक प्रकारावर आमचे बारीक लक्ष राहील," असा इशारा अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिला आहे.
तसेच, कुणाचीही अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ ‘अंनिस’ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.