नाशिक, (प्रतिनिधी) १६ ऑक्टोबर -
नाशिकमधील प्रायोगिक नाट्यचळवळीला नवी दिशा देण्यासोबतच स्थानिक रंगकर्मींसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ‘स्पॉटलाइट थिएटर’च्या माध्यमातून शहरात नवनवीन प्रायोगिक नाट्यप्रयोगांची पर्वणी रंगभूमीप्रेमींना अनुभवायला मिळत आहे.
मुंबई-पुण्यासह इतर शहरांमध्ये गाजणारी आणि नाशिकमध्ये सहज उपलब्ध न होणारी प्रायोगिक नाटके स्थानिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावीत, तसेच नाट्यसंस्थांना परवडणाऱ्या खर्चात प्रयोग सादर करता यावेत, या उद्देशाने नाशिकच्या तरुण रंगकर्मींनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
सचिन रहाणे आणि नीलेश सूर्यवंशी या तरुण रंगकर्मींनी मायको एम्प्लॉयी फोरमच्या सहकार्याने संभाजी स्टेडियमजवळील मायको हॉल येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून ‘स्पॉटलाइट थिएटर’ची निर्मिती केली आहे.
चेतन बर्वे, भूषण भावसार, नितीन साळुंखे, विकास नरवडे, संजय कुरे, केतकी कुलकर्णी, मधुरा तरटे, महेश शिरसाठ, रविकांत शार्दूल आणि राजीव नाईक यांच्यासह अनेक रंगकर्मी या थिएटरच्या उभारणी आणि विकासासाठी सक्रिय योगदान देत आहेत.
स्थानिक कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना आपली कलात्मक क्षमता सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, नाट्यनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे आणि प्रायोगिक नाटकांचे नियमित मंचन व्हावे, या दृष्टीने ‘स्पॉटलाइट थिएटर’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
गेल्या काही महिन्यांत या थिएटरमध्ये ‘मौत तू एक कविता है’, ‘भयंकराच्या दरवाजात कोण?’, ‘कुठे आहे लक्ष्मी?’, ‘आईना’ आणि ‘सीझन एक्स एपिसोड वाय’ यांसारख्या अनेक प्रायोगिक नाटकांचे प्रयोग सादर झाले. या प्रयोगांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
थिएटरची रचना, तांत्रिक सुविधा आणि सादरीकरणासाठीचे वातावरण पाहून मुंबई, पुणे आणि इतर शहरांतील अनेक प्रायोगिक रंगकर्मीही येथे आपली नाटके सादर करण्यासाठी उत्सुक आहेत.
पुण्यात गाजलेले ‘गोष्ट अजून संपली नाही’ १८ ऑक्टोबरला
स्पॉटलाइट थिएटरच्या याच रंगप्रवासात येत्या रविवार, १८ ऑक्टोबर रोजी पुण्यात तुफान गाजलेले आणि प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारे ‘गोष्ट अजून संपली नाही’ हे नाटक नाशिककरांच्या भेटीला येत आहे.
सायंकाळी ६.३० आणि रात्री ८.३० वाजता या नाटकाचे सलग दोन प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. यातील एका प्रयोगाची तिकिटे हाऊसफुल्ल झाली आहेत.
या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा केवळ प्रेक्षक म्हणून बसून पाहण्याचा अनुभव नाही, तर प्रेक्षकांनाही थेट त्या भयावह अनुभवाचा हिस्सा बनवणारा प्रयोग आहे. नाट्य आणि वास्तव यांमधील सीमारेषा धूसर करत प्रेक्षकांना वेगळ्याच अनुभूतीत घेऊन जाणारे हे नाटक नाशिककरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
‘श्योक’च्या माध्यमातून राष्ट्रीय दर्जाच्या रंगानुभवाची पर्वणी
त्यानंतर रविवार, १ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात National School of Drama (NSD) येथे प्रशिक्षित कलाकारांचा ‘श्योक’ हा दमदार नाट्यप्रयोग स्पॉटलाइट थिएटरमध्ये सादर होणार आहे.
या नाटकाचे सायंकाळी ५.३० आणि रात्री ८ वाजता असे सलग दोन प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
भारतातील अनेक राष्ट्रीय नाट्य महोत्सवांमध्ये गौरव प्राप्त केलेल्या या नाटकाचे महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईनंतर प्रथमच नाशिकमध्ये प्रयोग होणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या नाट्यरसिकांना राष्ट्रीय स्तरावर दखल घेतलेल्या नाट्यनिर्मितीचा अनुभव आपल्या शहरातच घेता येणार आहे.
नाशिकच्या समृद्ध रंगभूमी परंपरेला नवे बळ देणारे ‘स्पॉटलाइट थिएटर’ हे केवळ नाटक सादर करण्याचे ठिकाण नसून, नव्या कल्पना, नवे प्रयोग आणि नव्या रंगकर्मींसाठी खुले झालेले एक सर्जनशील व्यासपीठ आहे.
परवडणाऱ्या खर्चात प्रायोगिक नाटकांना मंच उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास नाशिकची प्रायोगिक नाट्यचळवळ अधिक व्यापक होण्यास मदत होणार आहे.
तेव्हा १८ ऑक्टोबरला ‘गोष्ट अजून संपली नाही’ आणि १ नोव्हेंबरला ‘श्योक’ हे दोन वेगळ्या धाटणीचे नाट्यप्रयोग अनुभवण्यासाठी नाशिककर रंगभूमीप्रेमींनी स्पॉटलाइट थिएटरला आवर्जून भेट द्यावी.
नाशिकच्या रंगभूमीला नवा प्रकाश देणाऱ्या या उपक्रमाला रसिकांनी दिलेला प्रतिसादच या चळवळीला अधिक बळ देणारा ठरणार आहे.