खेळाडूंना मोफत ऑलिम्पिक गोल्फ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी... असा घेता येणार लाभ...

Share:
Main Image
Last updated: 16-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १६ ऑक्टोबर - ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असलेल्या ‘गोल्फ’ (Golf) या खेळाचा नाशिक जिल्ह्यात व्यापक प्रसार व्हावा, क्रीडा शिक्षकांना या खेळाचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे आणि नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील या खेळाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने शनिवारी, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी निफाड येथे ‘एकदिवसीय मोफत ऑलिम्पिक गोल्फ प्रशिक्षण कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी ही माहिती दिली.

रिव्हरसाईड गोल्फ कोर्स, क्रीडा भारती नाशिक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (नाशिक) आणि नाशिक जिल्हा गोल्फ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.

क्रीडा क्षेत्राला मिळणार नवीन दिशा

जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील क्रीडा शिक्षक, महाविद्यालयीन क्रीडा संचालक, विविध खेळांचे प्रशिक्षक तसेच या खेळात रुची असणाऱ्या इच्छुक खेळाडूंना या प्रशिक्षणात मोफत सहभागी होता येणार आहे.

क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक हे विद्यार्थ्यांपर्यंत नवीन क्रीडा प्रकार पोहोचवण्यातील महत्त्वाचा दुवा असतात. त्यांना गोल्फचे प्राथमिक ज्ञान आणि प्रत्यक्ष मैदानावर प्रशिक्षण मिळाल्यास शाळा, महाविद्यालये व क्रीडा संस्थांमध्ये या खेळाची नवी पिढी घडवणे अधिक सोपे होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

गोल्फच्या तांत्रिक कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

प्रशिक्षणादरम्यान गोल्फचा इतिहास, ऑलिम्पिकमधील त्याचे स्थान, खेळाचे नियम, मैदानाची रचना, क्रीडा साहित्याचा योग्य वापर, सुरक्षितता आणि खेळातील शिस्त याविषयी तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे, केवळ बौद्धिक माहिती न देता प्रत्यक्ष मैदानावर गोल्फ स्टिक हाताळणे, योग्य ग्रीप (Grip), स्टान्स (Stance), स्वींग (Swing), पुटिंग (Putting), चीपिंग (Chipping) आणि ड्रायव्हिंग (Driving) यांसारख्या मूलभूत कौशल्यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाईल. सहभागी प्रशिक्षणार्थींना स्वतः गोल्फ मैदानावर खेळण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

प्रशिक्षणाची वेळ, स्थळ आणि स्वरूप

Advertisement

हे प्रशिक्षण सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत चालणार आहे.

स्थळ: रिव्हरसाईड गोल्फ कोर्स, बागमार इस्टेट्स, पिंपळगाव रोड, राज्य महामार्ग क्रमांक २७, निफाड, जि. नाशिक.

कार्यक्रमात सैद्धांतिक मार्गदर्शन, साहित्याचे प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष सराव आणि कौशल्यविकास उपक्रमांचा समावेश असेल. हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून, ते यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींना अधिकृत सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.

ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना https://forms.gle/Yc2AVPFfJFwknseA6 या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी:

विंग कमांडर प्रदीप बागमार (निवृत्त) – ९४२२७०४६१४

सुनंदा पाटील (जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक) – ९४२३३४३८०२

रवींद्र नाईक (अध्यक्ष, क्रीडा भारती नाशिक) – ९४२१४१३१७९

गोल्फ हा एकाग्रता, संयम, शारीरिक समन्वय आणि मानसिक स्थैर्य यांचा संगम असलेला खेळ असल्याने नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडूंनी या मोफत संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Comments

No comments yet.