जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे बदल... आता असा करावा लागणार अर्ज...

Share:
Main Image
Last updated: 16-Oct-2026

 

जळगाव, (प्रतिनिधी) १६ ऑक्टोबर - राज्यातील नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. जातप्रमाणपत्र पडताळणी (Caste Certificate Verification) प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी आता ही संपूर्ण प्रणाली पूर्णपणे ऑनलाइन आणि पेपरलेस (Paperless) करण्यात आली आहे. या नव्या संगणकीय प्रणालीमुळे आता अर्जदारांना अर्ज, प्रतिज्ञापत्रे किंवा कागदपत्रांच्या हार्डकॉपी जमा करण्यासाठी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची कोणतीही आवश्यकता उरलेली नाही.

राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या नामांकित कंपनीच्या माध्यमातून ही अद्ययावत संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.

नव्या ऑनलाइन प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये:

ऑफिसचे फेरे बंद: अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जातील त्रुटींची (Deficiencies) पूर्तता करणे ही सर्व कामे आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनेच करता येतील.

Advertisement

घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी: सादर केलेल्या कागदपत्रांबाबत समितीला काही शंका असल्यास किंवा सुनावणीची गरज भासल्यास, अर्जदाराला प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार नाही. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Virtual Hearing) घेतली जाईल.

लाँच ट्रॅकिंग (Tracking): अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती (Status) आणि कामाची प्रगती ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहे.

सर्वांनी ऑनलाइन प्रक्रियेचाच अवलंब करण्याचे आवाहन

शैक्षणिक प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, विविध निवडणुका लढवणारे उमेदवार, शासकीय सेवेतील कर्मचारी आणि इतर सर्व प्रयोजनांसाठी जातप्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या नागरिकांनी या नवीन डिजिटल प्रक्रियेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष नयना बोंदार्डे, उपायुक्त राकेश महाजन आणि सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे. या क्रांतिकारी निर्णयामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून दलालांच्या मध्यस्थीला पूर्णपणे आळा बसणार आहे.

 

Comments

No comments yet.