मर्जीतल्या ठेकेदारांसाठी निलेश राणेंचा अधिकाऱ्यांवर दबाव... 'त्या' लेटर बॉम्बने पितळ उघड...

Share:
Main Image
Last updated: 15-Oct-2026

 

 

मुंबई (प्रतिनिधी), १५ ऑक्टोबर २०२६ -

आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक गेल्या दोन वर्षांपासून कुडाळ-मालवणमधील विकासकामांमध्ये थेट हस्तक्षेप करत असून, मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मिळवून देऊन 'टक्केवारी' लाटत असल्याचा खळबळजनक आरोप कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

निलेश राणेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यकारी अभियंत्यांना दिलेले एक पत्र नुकतेच व्हायरल झाले असून, हेच पत्र पुरावा म्हणून सादर करत वैभव नाईक यांनी राणेंचा भ्रष्ट कारभार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणीही नाईक यांनी केली आहे.

अधिकाऱ्यांवर दबाव अन् निविदा रद्द करण्याचा खेळ

पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग आणि जिल्हा परिषदेमधील विकासकामे केवळ आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच मिळावीत, यासाठी निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक इतर ठेकेदारांवर आणि शासकीय अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणत आहेत.

शासनाचा फायदा व्हावा यासाठी अनेक प्रामाणिक ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत स्पर्धात्मक पद्धतीने कमी टक्के दराने अर्ज भरले होते. परंतु, हे ठेकेदार आपल्या मर्जीतले नसल्याचे पाहून, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आणि त्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्या.

Advertisement

कमी दराच्या निविदा नाकारून फेरनिविदा (Retender) काढल्यामुळे शासकीय निधीचे मोठे नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या या संगनमतामुळे शासनाचे नुकसान झाले तरी चालेल, पण काम स्वतःच्याच ठेकेदाराला मिळाले पाहिजे, अशी भूमिका निलेश राणे यांची असल्याचा घणाघात नाईक यांनी केला.

"कामांमध्ये हस्तक्षेप; आधीची कामे अर्धवट तरीही नवी कंत्राटे"

वैभव नाईक यांनी पुढे नमूद केले की, जे ठेकेदार निलेश राणेंचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर निविदा मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातो. तरीही एखाद्याने स्पर्धात्मक अर्ज भरलाच, तर थेट अधिकाऱ्यांना पत्रे देऊन ती निविदा रद्द पाडण्यात येते. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निलेश राणेंनी दिलेले पत्र याचा प्रत्यक्ष पुरावा आहे.

ज्या ठेकेदारांनी आधीची विकासकामे अर्धवट सोडून दिली आहेत, अशांनाही पुन्हा नवीन कामे 'मॅनेज' करून दिली जात असल्याचा गंभीर आरोप नाईक यांनी केला.

"जर लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे दबाव टाकून टक्केवारी लाटणार असतील, तर निविदा प्रक्रिया काढण्याचे नाटक तरी कशाला करता? परस्पर तुम्हाला हव्या त्या ठेकेदाराला कामे वाटून टाका," असा संतप्त टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी

आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले हे व्हायरल पत्र मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन वर्षांत कुडाळ-मालवण मतदारसंघात स्पर्धात्मक पद्धतीने न झालेल्या सर्व विकासकामांची, निविदा प्रकरणांची आणि यातील भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी व पालकमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी.

तसेच या भ्रष्टाचारात जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. या 'लेटर बॉम्ब'मुळे कोकणातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet.