मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन... ३१ फुटी ध्वजस्तंभाची अशी आहेत वैशिष्ट्ये...

Share:
Main Image
Last updated: 15-Oct-2026

 

 

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी), १५ ऑक्टोबर २०२६ -

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर आज धार्मिक परंपरेनुसार आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात भव्य ध्वजस्तंभ पूजन सोहळा पार पडला.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि साधू-संत, महंतांच्या साक्षीने हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या पूजनाने त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्यक्ष नियोजनाला आणि विकासकामांना मोठी गती मिळाली आहे.

३१ फुटी ध्वजस्तंभावर 'समुद्र मंथन' संकल्पना

या सोहळ्यात पूजित करण्यात आलेला ध्वजस्तंभ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक आहे:

 * उंची: या ध्वजस्तंभाची एकूण उंची ३१ फूट आहे.

 * संकल्पना: ध्वजस्तंभावर पौराणिक 'समुद्र मंथन' संकल्पना अतिशय सुंदर पद्धतीने साकारण्यात आली आहे.

Advertisement

 * वैशिष्ट्ये: समुद्र मंथनातून प्राप्त झालेली रत्ने ध्वजावर दर्शवण्यात आली आहेत. ध्वजस्तंभाच्या पायथ्याशी श्री गणेशाची प्रतिमा तर सर्वात वरील टोकावर अमृतकलश धारण केलेल्या गरुडाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.

या सोहळ्याची सांगता पवित्र कुशावर्त तीर्थावर झालेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गंगा आरतीने झाली.

गर्दी व्यवस्थापन, सूक्ष्म नियोजन अन् कामांना गती: पालकमंत्री गिरीश महाजन

ध्वजस्तंभ पूजनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेला आणि सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

"त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन (Crowd Management), वाहतूक नियोजन आणि पायाभूत सुविधांची कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. आगामी काळात मा. राष्ट्रपती महोदयांचा नियोजित दौरा असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसातील समन्वय वाढवून सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी," असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

साधू-संत, महंत आणि अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

धार्मिक परंपरा आणि प्रशासकीय तयारीचा संगम असलेल्या या सोहळ्यास लोकप्रतिनिधींसह आखाड्यांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सहायक धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे व नाशिक पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांसह विविध आखाड्यांचे साधू-संत आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच शासकीय विभागांनी एकमेकांशी ताळमेळ ठेवून काम करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

Comments

No comments yet.