बसस्थानकांवर प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद... २४ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त...

Share:
Main Image
Last updated: 15-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १५ ऑक्टोबर - नाशिक शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणांवर प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तब्बल २४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे १६३ ग्रॅम ६६ मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नाशिक आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेले चोरीचे तब्बल १० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

बसस्थानक परिसरात सापळा रचून कारवाई

सण-उत्सवांच्या काळात बसस्थानक परिसरांमध्ये प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आणि शहरात घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांची तात्काळ उकल करण्याचे सक्त आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी दिले होते.

या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक कार्यरत होते. दरम्यान, दि. १३ ऑक्टोबर रोजी पथकातील अंमलदार आप्पा पानवळ, राम बर्डे, मुक्तार शेख आणि पोलीस हवालदार गोरक्ष साबळे यांना शहरातील बसस्थानक परिसरात परराज्यातील एक आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पथकाने तातडीने संबंधित भागात सापळा रचला आणि दोन संशयितांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

उत्तर प्रदेशातील दोन सराईत गजाआड

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता, ते उत्तर प्रदेशातील असल्याचे स्पष्ट झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

१. जावेद अब्दुल गफ्फार (वय ४० वर्षे, रा. एअरसेल टॉवरच्या मागे, मोहल्ला चाहशिरीन, बी-२४, जि. बिजनौर, उत्तर प्रदेश)

२. अरुणकुमार प्रेमदत्त शर्मा (वय ५६ वर्षे, रा. ग्राम पोस्ट सिकरी बुजुर्ग, नेहा टॉवर, तहसील धामपूर, जि. बिजनौर, उत्तर प्रदेश)

Advertisement

पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने मिळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुदमालाची एकूण किंमत २४ लाख ४३ हजार रुपये इतकी आहे.

१० गुन्ह्यांची कबुली; नाशिक पोलिसांना मोठे यश

पोलिसांनी संशयितांकडे पोलिसी बडगा उगारताच त्यांनी नाशिक शहरातील विविध बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणांहून प्रवाशांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर नाशिकमधील खालील पोलीस ठाण्यांमधील घरफोड्या व चोऱ्यांच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे:

सरकारवाडा पोलीस ठाणे: ०७ गुन्हे (सन २०२४ मधील १, २०२५ मधील ५ आणि २०२६ मधील १ गुन्हा)

मुंबई नाका पोलीस ठाणे: ०२ गुन्हे (सन २०२६ मधील)

पंचवटी पोलीस ठाणे: ०१ गुन्हा (सन २०२६ मधील)

धडाकेबाज कामगिरी करणारे पथक

ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, डीसीपी किरणकुमार चव्हाण आणि एसीपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, जया तारडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, राम शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, राजेश लोखंडे तसेच युनिट-१ च्या संपूर्ण पोलीस अंमलदार पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आंतरराज्यीय चोरांच्या या टोळीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून पोलीस यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा कसून शोध घेत आहेत.

 

Comments

No comments yet.