ठेवीदारांच्या ४ कोटींवर डल्ला मारून लपला... आत्महत्येची धमकी देत बिल्डिंगवर चढला... पोलिसांनी असा शिताफीने धरला...

Share:
Main Image
Last updated: 15-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १५ ऑक्टोबर - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील गाजलेल्या ‘श्री संत माऊली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या तब्बल चार कोटी रुपयांच्या ठेवीदार फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि चेअरमन सुनील बाबासाहेब शिरसाठ याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने एका थरारक कारवाईत जेरबंद केले आहे. पोलिसांची चाहूल लागताच त्याने इमारतीच्या गॅलरीबाहेर असलेल्या डक्टवर लपून खाली उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती; मात्र पोलिसांनी अत्यंत प्रसंगावधान राखून त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

ठेवीदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून गंडा

पाथर्डी येथील या पतसंस्थेचे चेअरमन सुनील शिरसाठ, व्हाईस चेअरमन बाबासाहेब शिरसाठ आणि संचालक मंडळाने बचत खात्यांवर तसेच मुदत ठेवींवर (FD) आकर्षक व जादा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून शेकडो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा केल्या होत्या. मात्र, ठेवींची मुदत संपल्यानंतर ग्राहकांनी स्वतःचे पैसे परत मागितले असता, संचालक मंडळाने उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास साफ नकार दिला. याशिवाय, ठेवीदारांनी पतसंस्थेत गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने (गोल्ड लोन) देखील न परत करता परस्पर विकून सुमारे चार कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१६(५), ३१८(४), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण कायदा (MPID) कलम ३ व ४ अन्वये चेअरमन, व्हाईस चेअरमनसह ११ संचालकांविरुद्ध गंभीर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इमारतीच्या डक्टवरील थरार आणि पोलिसांचे धाडसी पाऊल

Advertisement

गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सूत्रधार सुनील शिरसाठ हा फरार होता. अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्याच्या शोधासाठी नाशिक शहर पोलिसांना साहाय्य मागितले होते. दरम्यान, संशयित सुनील शिरसाठ हा नाशिकरोड येथील आढाव पेट्रोल पंपाजवळ आपल्या सासऱ्यांच्या घरी लपून बसल्याची पक्की माहिती नाशिकरोड युनिटचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने तातडीने संबंधित घरावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच शिरसाठ घराच्या गॅलरीबाहेर असलेल्या डक्टवर जाऊन लपला. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले असता, तो अत्यंत आक्रमक झाला आणि "मला अटक केली तर मी डक्टवरून खाली उडी मारून जीवन संपवीन," अशी धमकी देऊ लागला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले; मात्र जवान येईपर्यंत आरोपीने टोकाचे पाऊल उचलल्यास अनर्थ घडला असता. हे ओळखून पोलिसांनी स्वतःच धाडसी कारवाईचा निर्णय घेतला. एका बाजूने पोलीस हवालदार अविनाश देवरे, केतन सोनवणे व कुणाल घोरपडे यांनी शिडी लावून त्याचे लक्ष विचलित केले; तर दुसऱ्या बाजूने उपनिरीक्षक संदीप पवार, अंमलदार सुशांत दिघे, समाधान जाधव व भरत राऊत यांनी खिडकीतून अत्यंत शिताफीने प्रवेश करत त्याला मागून घट्ट पकडून सुरक्षितपणे आत खेचले.

अहिल्यानगर पोलिसांच्या स्वाधीन

पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि या बहुचर्चित घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकण्यात आल्या. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयित सुनील शिरसाठ याला अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदीप पवार, अविनाश देवरे, केतन सोनवणे, कुणाल घोरपडे, सुशांत दिघे, समाधान जाधव आणि भरत राऊत यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी पार पाडली.

 

Comments

No comments yet.