मनमाड (प्रतिनिधी), १४ ऑक्टोबर २०२६ -
शासनाच्या ‘सेवा कर्मी संवाद / सेवा संकल्प अभियानांतर्गत’ मनमाड व नांदगाव नगरपरिषदांमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला, आरोग्याला आणि सामाजिक सन्मानाला प्राधान्य देणारा एक अतिशय स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई किट, गमबूट, गणवेश आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आदी सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.
याच कार्यक्रमात मनमाड नगरपरिषदेच्या ३४ सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजने’अंतर्गत मोफत घरांच्या नोंदणीकृत दस्तऐवजांचे वितरण करण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला व आरोग्याला प्राधान्य
शहराची स्वच्छता राखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सफाई कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यांच्या दैनंदिन कामाच्या ठिकाणी सुरक्षा सुनिश्चित करणे, आवश्यक साधने उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सेवेचा गौरव करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वितरित करण्यात आलेल्या पीपीई किट, गमबूट आणि गणवेशामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामादरम्यान सुरक्षेची योग्य साधने मिळण्यास मदत होणार आहे.
३४ सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर
मनमाड नगरपरिषदेतील तब्बल ३४ सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजने’च्या माध्यमातून मोफत घरांचा लाभ मिळाला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या घरांसंदर्भातील कायदेशीर नोंदणीकृत दस्तऐवज लाभार्थ्यांच्या सुपूर्द करण्यात आले. आयुष्यभर शहराची सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर हक्काचे घर मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
आमदार सुहास कांदे यांच्याकडून दिवाळी भेट
आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्या वतीने मनमाड व नांदगाव येथील सर्व सफाई कर्मचारी बंधू-भगिनींना स्रेह भेट म्हणून दिवाळीची भेट देण्यात आली.
यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना साड्या, तर पुरुष कर्मचाऱ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. सुरक्षा साहित्य, हक्काच्या घरांचे दस्तऐवज आणि दिवाळी भेट अशा विविध उपक्रमांतून प्रशासनाने व जनप्रतिनिधींनी सफाई कर्मचाऱ्यांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र घेतले भोजन
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, मनमाड नगरपरिषदेचे नगरसेवक, नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव व कर्मचारी, प्रांताधिकारी घोलप, नांदगावचे तहसीलदार सैंदाणे, तालुका निबंधक जावेद शेख तसेच मनमाड नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे, उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन भोजनाचा आस्वाद घेतला.
सफाई कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या योगदानाचा आदर करण्याच्या आणि त्यांना आपलेपणाची भावना देण्याच्या उद्देशाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.