नाशिक, (प्रतिनिधी) १४ ऑक्टोबर - महानगरपालिकेची प्लास्टिकविरोधी कारवाई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) बडगा, बँकांचे अतिरिक्त चार्जेस आणि फिरत्या विक्रेत्यांची तीव्र स्पर्धा... अशा अनेकविध समस्यांमुळे अवघ्या १ ते २ टक्के नफ्यावर व्यवसाय करणारा किरकोळ व्यापारी पुरता मेटाकुटीस आला आहे. या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरने पुढाकार घेतला असून, संबंधित शासकीय विभागांशी लवकरच पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष बैठका घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘आवाज उद्योजकांचा – व्यापाऱ्यांचा, साथ महाराष्ट्र चेंबरची’ या अभियानांतर्गत महाराष्ट्र चेंबर आणि नवीन नाशिक किरकोळ धान्य किराणा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी (१२ ऑक्टोबर २०२६) महाराष्ट्र चेंबरच्या नाशिक कार्यालयात पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या दैनंदिन समस्यांवर सविस्तर मंथन करण्यात आले.
प्रशासकीय जाच आणि अतिरिक्त आर्थिक भारामुळे व्यापारी त्रस्त
बैठकीत नवीन नाशिकच्या व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणींचा पाढा वाचला. "अनेकदा किरकोळ व्यापारी नाममात्र नफ्यावर व्यवसाय करतो. मात्र, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न-औषध प्रशासनाकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाया, मार्केट सेसची आकारणी आणि बँकांकडून लादले जाणारे विविध शुल्काचे भुर्दंड यांमुळे व्यापारी उद्ध्वस्त होत आहेत. त्यातच अनधिकृत फिरत्या दुकानांमुळे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांसमोर स्पर्धेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रशासनाने व्यावहारिक भूमिका घेऊन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा," अशी आग्रही मागणी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केली.
शासकीय विभागांसोबत लवकरच निर्णायक बैठका
व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर महाराष्ट्र चेंबरचे राज्य मुख्य समन्वयक वेदांशू पाटील, नाशिक शाखेचे चेअरमन सचिन शहा आणि को-चेअरमन दिपाली चांडक यांनी व्यापाऱ्यांना पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आयुक्त तुकाराम मुंडे व संजय खंदारे यांच्याशी नुकत्याच झालेल्या सकारात्मक चर्चेची माहिती देण्यात आली. चेअरमन सचिन शहा यांनी स्पष्ट केले की, "महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने नामदार नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांवरील कारवायांबाबत भूमिका मांडली होती, ज्यावर मंत्र्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे."
व्यापारी-उद्योजकांसाठी ‘हेल्प डेस्क’ सुरू
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मानगवे यांच्या पुढाकाराने व्यापारी व उद्योजकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी विशेष ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्यात आल्याची माहिती वेदांशू पाटील यांनी दिली. व्यापाऱ्यांनी आपल्या अडीअडचणी व तक्रारी या हेल्प डेस्कवर नोंदवाव्यात, जेणेकरून त्यावर पाठपुरावा करणे सुलभ होईल, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस नवीन नाशिक किरकोळ किराणा संघटनेचे अध्यक्ष सुरेश खाबिया, माजी अध्यक्ष नाना जाधव, बळीराम शिरोडे, महेंद्र विभांडिक, निवृत्ती शिरुडे, शरद दातीर, महाराष्ट्र चेंबरचे को-चेअरमन सुरेश चावला, जिल्हा समन्वयक भावेश मानेक, कार्यकारिणी सदस्य वासुदेव भगत यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते. सुरेश चावला यांनी स्वागत तर भावेश मानेक यांनी आभार मानले.