धुळे, (प्रतिनिधी) १४ ऑक्टोबर - धुळे आणि नंदुरबार या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार्या सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. सन १९९९ पासून रेंगाळलेल्या 'प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजने'च्या संथ गतीबद्दल पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेला केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून, योजनेचा केंद्रीय निधीच्या यादीत समावेश करण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राम भदाणे यांच्यासह तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१९९९ पासूनच्या दिरंगाईवर पालकमंत्री जयकुमार रावल आक्रमक
प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजना ही शिंदखेडा, नंदुरबार आणि साक्री तालुक्यांतील दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तापी नदीतील वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागातील शेतीसाठी वळवून शाश्वत सिंचन निर्माण करण्याची क्षमता या योजनेत आहे.
मात्र, तब्बल दोन दशकांहून अधिक काळ (१९९९ पासून) काम सुरू असूनही ठेकेदार आणि प्रशासकीय यंत्रणेकडून होत असलेल्या विलंबाबद्दल मंत्री जयकुमार रावल यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी या योजनेसाठी सकारात्मकता दर्शवली असल्याने अधिकाऱ्यांनी कसलाही विलंब न करता केंद्राच्या निधी यादीत समावेश करण्यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
सुलवाडे-जामफळ योजना: १५ डिसेंबरपर्यंत धरणात पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट
बैठकीत 'सुलवाडे-जामफळ उपसा जलसिंचन योजनेच्या' प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत:
* उर्वरित ३०० मीटरची मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करणे,
* १३३ केव्ही विद्युत पुरवठ्याची उर्वरित कामे वेगाने करणे,
* १५ डिसेंबरपर्यंत जामफळ धरणात पाणी पोहोचवण्याचे तंतोतंत नियोजन करणे.
या जलद कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
अक्कलपाडातून हामडा नाल्यात पाणी सोडण्याची मागणी
साक्री तालुक्यातील दुष्काळी भीषणता कमी करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून हामडा नाल्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणीही मंत्री जयकुमार रावल यांनी मांडली. या निर्णयामुळे फोफरे, घाणेगाव यांसह माळमाथा परिसरातील १३ ते १४ दुष्काळी गावांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा थेट लाभ मिळणार आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही या सर्व सिंचन प्रकल्पांची गंभीर दखल घेत, अधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीवर नियमित लक्ष ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.