ध्वजारोहण ३१ रोजी... पण नाशिक पोलिस या दिवशी करणार जय्यत... असे आहे जबरदस्त नियोजन...

Share:
Main Image
Last updated: 14-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १४ ऑक्टोबर - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून नाशिक शहरात ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या सुरक्षेसाठी नाशिक शहर पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्ताची 'रंगीत तालीम' (मॉकड्रिल) आयोजित करण्यात आली आहे.

३० व ३१ ऑक्टोबरला महत्त्वाचे धार्मिक सोहळे

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य धर्मध्वज शोभायात्रा व नगरप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ऐतिहासिक रामकुंड परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम आणि सायंकाळी गोदावरी नदीकाठी महाआरती संपन्न होणार आहे. या सर्व सोहळ्यांना भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून चोख नियोजन केले जात आहे.

१५ ऑक्टोबर रोजी रंगीत तालमीचे वेळापत्रक

गुरुवारी सकाळी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी पुढील नियोजनानुसार बंदोबस्ताचा प्रत्यक्ष सराव आणि पडताळणी करण्यात येईल:

| वेळ | कार्यक्रम | ठिकाण |

Advertisement

 

| सकाळी १०.३० ते ११.३० | ध्वजारोहण सराव | रामकुंड परिसर |

| सकाळी ११.३० ते १२.३० | गोदावरी आरती सराव | भाजी बाजार पटांगण परिसर, रामकुंड |

| दुपारी १२.३० ते १३.३० | धर्मध्वज शोभायात्रा सराव | शोभायात्रा मिरवणूक मार्ग |

समन्वय, गर्दी नियंत्रण व आपत्कालीन व्यवस्थापनाची चाचपणी

या रंगीत तालमीदरम्यान सर्वप्रथम ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमस्थळावरील सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. त्यानंतर गोदावरी आरतीच्या ठिकाणची सुरक्षा व भाविकांच्या गर्दीच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात येईल. शेवटी ३० ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या धर्मध्वज शोभायात्रेच्या संपूर्ण मार्गावरील बंदोबस्ताचे नियोजन व अंमलबजावणी तपासली जाणार आहे.

या प्रक्रियेद्वारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यातील प्रत्यक्ष समन्वय, वाहतूक नियमन, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करायच्या तत्काळ उपाययोजनांची सूक्ष्म पडताळणी करण्यात येईल. या सरावातील त्रुटी दूर करून मुख्य सोहळ्यांसाठी पोलीस बंदोबस्त अधिक सक्षम व अभेद्य केला जाईल, असा विश्वास नाशिक शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

Comments

No comments yet.