नाशिक, (प्रतिनिधी) १४ ऑक्टोबर - महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याच्या प्रक्रियेत नाशिक जिल्हा वेगाने पुढे जात असून, नुकत्याच जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत तब्बल ४,६९१ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
आतापर्यंत ४४ हजारांहून अधिक शेतकरी पात्र लाभार्थी यादीत
या योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २३,७७१ आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ४२,२३५ अशा एकूण ६६,६०० शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने जाहीर झालेल्या याद्यांनुसार आतापर्यंत एकूण ४४,३८७ शेतकरी पात्र ठरले आहेत:
पहिली यादी (२८ जुलै २०२६): ३५,८९० शेतकरी (यापैकी ३३,३७३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण).
दूसरी यादी (११ सप्टेंबर २०२६): ३,८०६ शेतकरी (यापैकी २,७९४ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण).
तिसरी यादी (१३ ऑक्टोबर २०२६): ४,६९१ शेतकरी (प्रमाणीकरणाचे कार्य युद्धपातळीवर सुरू).
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायती आणि विकास संस्थांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे
कर्ज थकबाकीची मर्यादा: या योजनेसाठी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार कर्जाची थकबाकी ग्राह्य धरण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ केले जाणार आहेत.
'हेअर कट' धोरण: राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या यादीतील ज्या शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांचे संबंधित कर्ज शासनाच्या 'हेअर कट' धोरणानुसार पूर्णपणे निरंक केले जाणार आहे.
मृत व वयस्कर लाभार्थ्यांसाठी विशेष एसओपी: जे शेतकरी हयात नाहीत किंवा जे वयस्कर आहेत आणि ज्यांच्या बोटांचे ठसे जुळण्यात अडचण येत आहे, अशा लाभांसाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष कार्यप्रणाली (SOP) जारी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे? (ई-केवायसी प्रक्रिया)
पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची खातरजमा करून नजीकच्या आपले सरकार केंद्रावर किंवा ई-सेवा केंद्रात जाऊन विनामूल्य आधार प्रमाणीकरण (e-KYC) तातडीने पूर्ण करावे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमुक्तीची निश्चित रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा केली जाणार आहे.
कर्जखात्याच्या क्रमांकाबाबत किंवा अर्जात काही त्रुटी अथवा तक्रार असल्यास आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेच्या शाखेशी किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.