मुंबईत कापड व्यापाऱ्यांना असा घालायचे गंडा... नाशिकचे तिघे जेरबंद... तपासात उघड झाले...

Share:
Main Image
Last updated: 13-Oct-2026

कल्याण, (प्रतिनिधी) १३ ऑक्टोबर - ऑनलाईन पेमेंटचा आभासी बनाव रचून व्यापारी आणि दुकानदारांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या एका भामट्या टोळीचा मुंबईतील खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मोबाईलवर बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा बनावट मेसेज (Fake UPI Confirmation SMS) आणि स्क्रीनशॉट दाखवून कपड्यांच्या दुकानांमधून महागडे कपडे लांबवणाऱ्या नाशिकमधील तीन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

समीर फरहान (३०), मोहसीन शेख (१९) आणि कैफ साहा (२४) अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे असून ते नाशिकच्या कुरेशी नगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून विविध नामांकित कंपन्यांचे २४० कपडे (शर्ट, ट्राऊझर्स, स्वेटर, जीन्स, ट्रॅक पॅंट्स) आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

अशी उघडकीस आली घटना

खार पश्चिम येथील 'शुभ्रा अपार्टमेंट'मधील दुकान क्रमांक २ चे मालक राजेश नरसी पटेल यांच्या दुकानात ११ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. आरोपी खरेदीदाराच्या अवतारात दुकानात आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात कपडे पसंत केले. बिल देण्याची वेळ आली असता, त्यांनी दुकानदाराचा मोबाईल नंबर मागून घेतला आणि आपल्या मोबाईलवरून UPI द्वारे पैसे भरल्याचा बनाव रचला. बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा खोटा SMS व स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवला आणि कपड्यांचे पार्सल घेऊन पसार झाले.

काही वेळाने खात्यात खरोखर पैसे जमा न झाल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे दुकानदाराच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ खार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

खार पोलिसांचा गुप्त सापळा आणि नाशिकमधून अटक

तक्रार दाखल झाल्यानंतर खार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही टोळी नाशिकमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

उप पोलीस आयुक्त (DCP) डॉ. मोहितकुमार गर्ग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शैलेश चौधरी व त्यांच्या पथकाने नाशिकच्या कुरेशी नगर भागात धाड टाकून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मुंबईसह वडाळा आणि आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

व्यापाऱ्यांनो खबरदारी घ्या! — पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

यूपीआय (UPI) द्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खार पोलिसांनी व्यापारी व नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत:

१. बँक खात्याची खात्री करा: पेमेंट झाल्याचा मेसेज किंवा स्क्रीनशॉट ग्राहक दाखवत असला, तरी स्वतःच्या अधिकृत बँक अ‍ॅप (Bank App) किंवा साऊंडबॉक्समध्ये (Soundbox) पैसे जमा झाल्याची खात्री केल्याशिवाय वस्तू ग्राहकाच्या ताब्यात देऊ नका.

२. UPI PIN फक्त पैसे देण्यासाठी: कोणताही ग्राहक अथवा व्यक्ती पैसे पाठवत असल्यास तुम्हाला UPI PIN टाकण्याची गरज नसते. पैसे मिळवण्यासाठी PIN टाकणे म्हणजे फसवणूक होणे.

३. अनोळखी लिंक्स टाळा: व्हॉट्सअ‍ॅप, SMS किंवा ईमेलवर येणाऱ्या अनोळखी लिंक्स, APK फाईल्स अथवा रिफंड आणि KYC च्या नावाखाली येणाऱ्या ऑफर्सवर क्लिक करू नका.

४. संशय आल्यास संपर्क साधा: कोणतीही संशयास्पद व्यवहार प्रक्रिया आढळल्यास तात्काळ आपल्या बँकेशी आणि जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.

सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून या टोळीने महाराष्ट्रात इतर कुठे कुठे अशा प्रकारे व्यापाऱ्यांना लुटले आहे का, याचा अधिक तपास खार पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet.