नाशिक (प्रतिनिधी), १३ ऑक्टोबर २०२६ -
शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. बांधकाम साईटवर मोलमजुरी करणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय पीडित आदिवासी तरूणीवर दोघा भामट्यांनी आळीपाळीने सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
औषधोपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याचा बहाणा करून दोन्ही नराधमांनी हे घाणेरडे कृत्य केले आहे. या धक्कादायक घटनेमुळे नाशिकमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी एक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची जलद चक्रे फिरवत दोन्ही संशयित आरोपींना गजाआड केले आहे. न्यायालयाकडून आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मदतीचा बहाणा आणि विश्वासाचा घात
विक्रम इंद्रजीत साह (वय ३०) आणि अशोक चंदीरका साह (वय ३६, दोघे मूळ रा. बिहार, हल्ली रा. धोत्रेचाळ, नवनाथनगर, पेठ रोड) अशी अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एक १९ वर्षीय पीडित आदिवासी तरूणी आपल्या कुटुंबासह मखमलाबाद परिसरातील एका बंगल्याच्या बांधकाम साईटवर वास्तव्यास असून संपूर्ण कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. संशयित विक्रम साह याचे या साईटवर येणे-जाणे असल्याने पीडित कुटुंबाशी त्याची ओळख होती.
शनिवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी दिवसभराच्या कामानंतर पीडित तरूणीला अचानक तीव्र पोटदुखी आणि ताप आल्याने ती झोपली होती. यावेळी नेहमीप्रमाणे आलेल्या विक्रमने चौकशी केली असता कुटुंबीयांनी मुलगी आजारी असल्याचे सांगितले. यावेळी मदतीचा आव आणत विक्रमने तिला पंचवटीतील एका खासगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला आणि स्वतःच्या दुचाकीवर बसवून रुग्णालयात घेऊन गेला.
घरात नेऊन अत्याचार अन् जीवे मारण्याची धमकी
दवाखान्यात डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून ग्लुकोज पावडरचे पाणी पिण्याचा सल्ला दिला. रात्री आठ वाजेच्या सुमारास दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर नराधम विक्रमने "माझी खोली जवळच असून घरात ग्लुकोज पावडर आहे," असे सांगून भोळ्याभाबड्या तरूणीला विश्वासघातकी पद्धतीने आपल्या खोलीवर नेले.
तेथे त्याचा साथीदार अशोक साह आधीपासूनच उपस्थित होता. यानंतर दोन्ही आरोपींनी आजारी असलेल्या हतबल तरूणीला धाक दाखवून व दमदाटी करून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली.
अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल; पोलिसांकडून बेड्या
घटनेनंतर पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घर गाठले. घरी पोहचल्यानंतर मुलीच्या अवस्थेवरून कुटुंबीयांनी विचारणा केली असता तिने घडलेली सर्व आपबिती कथन केली. कुटुंबीयांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक मयुरी तुरे करत आहेत.