नाशिक, (प्रतिनिधी) १३ ऑक्टोबर - राज्य शासनाच्या रोजगाराभिमुख दृष्टिकोनाला पूरक ठरणाऱ्या एका महत्त्वकांक्षी उपक्रमाद्वारे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात युवक आणि महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे. ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’च्या वतीने आणि 'सर दोराबजी टाटा ट्रस्ट' (SDTT) यांच्या सहकार्याने सिन्नर येथे सुरु असलेले 'उपजीविका संसाधन केंद्र' (Livelihood Resource Centre – LRC) ग्रामीण भागातील युवक-महिलांना कौशल्य विकास, थेट रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या विविध संधींशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे.
तालुक्यातील १२ गावांमध्ये जनजागृती मोहीम
ग्रामीण भागातील उपलब्ध मनुष्यबळाला योग्य प्रशिक्षण, समुपदेशन आणि बाजारपेठेची जोड देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने सिन्नर तालुक्यातील १२ गावांमध्ये व्यापक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये मनेगाव, धोंडवीरनगर, कुंदेवाडी, मुसळगाव, बारागाव पिंपरी, पाट पिंपरी, हरसुळे, सोनांबे, लोणवारवाडी, भाटवाडी, वडगाव सिन्नर आणि खापरळे या गावांचा समावेश आहे.
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, समुदाय संसाधन व्यक्ती, अंगणवाडी सेविका, कृषी सखी, शिक्षक आणि महिला बचत गटांच्या सहकार्याने नागरिकांपर्यंत उपजीविकेच्या संधी पोहोचवण्यात येत आहेत. गावागावांत जनजागृती बैठका घेऊन युवकांना व महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षणाकडे आकर्षित केले जात आहे.
महिला उद्योजकता: प्रशिक्षणातून स्वतःचा ब्रँड आणि लोगो निर्मिती
महिलांना केवळ पारंपरिक प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष 'उद्योजकता जागरूकता कार्यक्रम' आयोजित करण्यात आला. यामध्ये ४८ महिलांनी सहभाग घेतला होता. यातून निवडलेल्या ३६ महिलांसाठी विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण सत्र पार पडले.
या प्रशिक्षणादरम्यान महिलांना खालील मुख्य घटकांचे धडे देण्यात आले:
* व्यवसाय नियोजन: व्यवसायाची योग्य निवड आणि व्यावहारिक व्यवसाय आराखडा तयार करणे.
* आर्थिक साक्षरता: उत्पादन खर्च, किंमत निर्धारण, कॅशबुक व्यवस्थापन आणि वित्तीय साक्षरता.
* विपणन व बाजारपेठ: बाजारपेठेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, ग्राहक व पुरवठादारांशी संपर्क साधणे आणि शासकीय योजनांची माहिती.
* कौशल्य विकास: संवादकौशल्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि समस्या निवारण.
विशेष म्हणजे, प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वतःच्या संभाव्य व्यवसायासाठी प्रत्यक्ष व्यवसाय आराखडा तयार करण्यासोबतच स्वतःच्या ब्रँडसाठी 'लोगो' आणि 'टॅगलाइन' देखील तयार केली आहे.
युवकांसाठी रोजगार आणि औद्योगिक जोडणी
युवकांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी मिळवून देण्यासाठी केंद्रातर्फे लक्षीत १२ गावांमध्ये युवक संघटन मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), चार व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आणि दोन पदवी-पदव्युत्तर महाविद्यालयांना भेटी देऊन युवकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
युवकांच्या पुढील कौशल्याधारित प्रशिक्षणाची नवीन तुकडी ऑक्टोबर २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होत आहे. उमेदवारांना थेट नोकरीच्या संधी मिळण्यासाठी विविध उद्योग क्षेत्रे, कॉर्पोरेट कार्यालये आणि 'ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था' (RSETI) यांच्याशी थेट समन्वय साधला जात आहे.
दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यावर भर
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ प्रशिक्षण देऊन किंवा नोकरी लावून न थांबता, युवक त्या रोजगारात टिकून आहेत का, महिलांच्या व्यवसायाची प्रगती कशी सुरू आहे आणि त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नात खरोखर वाढ होत आहे का, याचा नियमित आढावा घेतला जातो. यामुळे ग्रामीण कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होत आहे.
सन १९९९ पासून शिक्षण, जीवन कौशल्ये आणि रोजगाराभिमुख विकासात कार्यरत असलेल्या 'मॅजिक बस इंडिया फाउंडेशन'च्या या उपक्रमामुळे सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागाचे आर्थिक चित्र बदलण्यास मदत होत असून, युवक आणि महिला स्वावलंबनाच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकत आहेत.