अक्षय काळे, (मुंबई) १३ ऑक्टोबर - राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा देत राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची बहुप्रतिक्षित तिसरी यादी जाहीर केली आहे. या नव्या यादीत राज्यातील तब्बल ३ लाख ५१ हजार १९२ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी याबाबतची माहिती दिली असून, यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर जाऊन आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करावे, असे आवाहन केले आहे.
दोन लाखांपर्यंतच्या थकीत पीककर्जाला माफी
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या नियमांनुसार, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे, तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, या संपूर्ण योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलद रीतीने व्हावी यासाठी महाआयटी (MahaIT) या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बँक आणि वित्तीय संस्थांद्वारे कर्जमुक्तीच्या पोर्टलवर राज्यातील एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली होती. या माहितीचे संगणकीय विश्लेषण व छाननी करून टप्प्याटप्प्याने याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
आतापर्यंत २४.६७ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध
या योजनेच्या अंमलबजावणीतील पहिल्या टप्प्यात २४ जुलै २०२६ रोजी १६.९६ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी ४.२० लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर झाली. आता १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ३.५१ लाख शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत राज्यातील एकूण २४.६७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या यादीतील विभागनिहाय आकडेवारी
तिसऱ्या यादीत सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत.
विविध विभागांतील लाभार्थ्यांची आकडेवारी अशी
विभाग आणि पात्र शेतकऱ्यांची संख्या
| छत्रपती संभाजीनगर | २,०६,४५० |
| अमरावती | ८५,०७६ |
| नागपूर | ३०,७३८ |
| नाशिक | १४,२४४ |
| पुणे | ११,९२८ |
| कोकण | २,७५६ |
| एकूण | ३,५१,१९२ |
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना व पुढील प्रक्रिया
१. ग्रामपंचायत व बँकांमध्ये यादी उपलब्ध: तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची जिल्हा निहाय व गाव निहाय यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (विकास संस्था) आणि ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२. संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ: यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
३. ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या थकबाकीची खातरजमा: यादीतील शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज आणि इतर कोणताही अतिरिक्त खर्च पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
४. 'हेअर कट' धोरणाचा फायदा: राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या यादीतील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक (Zero Balance) करण्यात येणार आहेत.
५. विशेष परिस्थितीतील लाभार्थ्यांसाठी SOP: ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे निधन झाले आहे, किंवा जे वयस्कर आहेत आणि ज्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे (Biometrics) केंद्रावर मॅच होत नाहीत, अशा लाभार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून शासनाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मानके कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे. त्यानुसार त्यांच्या वारसांना किंवा पर्यायी पद्धतीने लाभ दिला जाईल.
सहकार मंत्र्यांचे आवाहन
"आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली जाईल. त्यामुळे तिसऱ्या यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता, आपल्या कर्जखात्याच्या थकबाकीची खातरजमा करून तात्काळ नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा," असे आवाहनात्मक प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.