नाशिक, (प्रतिनिधी) १२ ऑक्टोबर - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह गोदाघाट, रामतीर्थ आणि कुशावर्त तीर्थ परिसरातील विकासकामे, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाला मोठी गती देण्यात आली आहे. देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याची माहिती 'नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणा'चे आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, श्री भक्तीचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ला आणि श्री पंचाक्षरी आदी मान्यवर उपस्थित होते.
गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
पत्रकार परिषदेत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. सध्या कार्यक्रमांची रूपरेषा प्राथमिक स्वरूपात असून, संबंधित विभागांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतले जातील. गर्दीचे नियोजन (Crowd Management), भाविकांची सुरक्षा, सार्वजनिक वाहतूक आणि पार्किंगच्या सुयोग्य व्यवस्थेला प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने विविध आखाडे, संत-महंत आणि धार्मिक संस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा व सूचना जाणून घेतल्या जात आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा वेळेत पूर्ण केल्या जातील.
२५ ऑक्टोबरला ऐतिहासिक 'शंखनाद'; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार
ध्वजारोहण सोहळ्याच्या औचित्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
* २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ऐतिहासिक 'शंखनाद' सोहळा पार पडणार असून, याची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (Guinness Book of World Records) मध्ये केली जाणार आहे. या जागतिक विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान केले जाईल.
* विशेष उपक्रम: सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचे (Website) लोकार्पण आणि विशेष 'कॉफी टेबल बुक'चे प्रकाशन करण्यात येणार आहे.
* सांस्कृतिक सोहळा: सायंकाळी गोदावरी नदीकाठी भव्य महाआरतीसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
स्वच्छता, घाटविकास आणि सुशोभीकरणावर भर
महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे संपूर्ण शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. गोदाघाट, रामकुंड आणि गांधी तलाव परिसरातील गाळ, बांधकामांचा राडारोडा व कचरा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
तसेच, गोदाघाटावरील फरसबंदी, काँक्रीटीकरण, परिसराचे सुशोभीकरण आणि भाविकांसाठी तात्पुरती व कायमस्वरूपी प्रसाधनगृहे (Toilets) उभारण्याच्या पायाभूत कामांना प्राधान्य दिले जात आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
विकासकामांमुळे पूर्वतयारीच्या काळात नागरिकांना तात्पुरता त्रास सहन करावा लागू शकतो. मात्र, हा सोहळा संपूर्ण नाशिककरांचा असल्याने शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.