नाशिक, (प्रतिनिधी) ११ ऑक्टोबर - मंत्र सिद्धी केलेला काळा धागा मनगटावर बांधल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सर्व प्रलंबित कामांमध्ये अचानक यश मिळण्यास सुरुवात होते, असा भ्रामक व चमत्कारसदृश दावा करणाऱ्या एका फलज्योतिषावर तातडीने कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महाराष्ट्र अंनिस) नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
५ पैशाच्या दोऱ्यासाठी ९०० रुपयांची लूट
सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या एका मेसेजमध्ये संबंधित फलज्योतिषाने दावा केला आहे की, आश्विन किंवा चैत्र नवरात्रीत मंत्रसिद्ध केलेला दिव्य काळा धागा उजव्या मनगटावर बांधल्यास यशाचे सर्व मार्ग खुले होतात. या तथाकथित दिव्य धाग्याची किंमत तब्बल ९०० रुपये ठेवण्यात आली असून, 'गुगल पे' (GPay) द्वारे पैसे जमा केल्यानंतर पोस्टाने हा धागा पाठवला जाईल, असे या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.
वास्तविक पाहता, ज्याची बाजारभावाने ५ पैशांचीही किंमत नाही, अशा साध्या काळ्या दोऱ्यासाठी ९०० रुपये उकळून सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे अंनिसने स्पष्ट केले आहे. लोकांच्या मनात असलेले अज्ञान, अंधश्रद्धा आणि दैवी तोडग्यांवर असलेला विश्वास यांचा गैरफायदा घेऊन या व्यक्तीने आजवर हजारो नागरिकांचे आर्थिक शोषण केल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
'बँक खाते सील करा आणि गुन्हे दाखल करा'
महाराष्ट्र अंनिसने पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि सोशल मीडिया मेसेजमध्ये दिलेल्या फलज्योतिषाचे बँक खाते व गुगल पे खाते तातडीने सील करण्यात यावे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जर संबंधित फलज्योतिषी आपल्या या चमत्कारसदृश दैवी दाव्यांवर आणि तोडग्यांवर ठाम असतील, तर त्यांनी हे दावे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अटी, शर्ती व नियमांनुसार आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध करून दाखवावेत. आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर असा कोणताही चमत्कार सिद्ध करणाऱ्या व्यक्तीसाठी महाराष्ट्र अंनिसने २१ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवलेले आहे. पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे जाहीर आव्हान देण्यात येत असून, पुढील सात दिवसांत हे आव्हान स्वीकारत असल्याचे लेखी स्वरूपात कळवावे, असेही अंनिसने नमूद केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पथकाची मागणी
धार्मिक व सांस्कृतिक सण-उत्सवांच्या काळात अशा प्रकारे चमत्कारसदृश दावे करणारे भोंदू बुवा विशेषतः पंचवटी परिसरात सक्रिय असण्याची शक्यता अंनिसने वर्तवली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा भोंदूगिरीत आणि फसवणुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तांनी आतापासूनच अशा सर्व अंधश्रद्धायुक्त आणि फसव्या गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे एक स्वतंत्र विशेष पथक तयार करून ते आत्तापासूनच कार्यरत ठेवावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे आणि रंजन लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.