Exclusive दिंडोरी तालुक्यात येताय या दिग्गज कंपन्या... कोट्यावधींची गुंतवणूक... हजारो रोजगार...

Share:
Main Image
Last updated: 12-Oct-2026

 

मनोहर शिंदे, (नाशिक) १२ ऑक्टोबर - नाशिकजवळील दिंडोरी तालुक्यातील आक्राळे फाटा परिसर आता राज्यातील प्रमुख 'फार्मा हब' म्हणून वेगाने नावारूपास येत आहे. ग्लॅनमार्क आणि रिलायन्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी या भागात मोठी गुंतवणूक करत आपले भव्य प्लॅन्ट उभारण्यास सुरुवात केली असून, या कोट्यवधींच्या गुंतवणुकीमुळे नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर दिंडोरीने आपले स्थान पक्के केले आहे.

दिग्गज कंपन्यांची मोठी गुंतवणूक

दिंडोरी येथील आक्राळे फाटा औद्योगिक वसाहतीत औषध निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपन्या आपले विस्तार प्रकल्प सुरू करत आहेत:

ग्लॅनमार्क फार्मा (Glenmark): ग्लॅनमार्क कंपनीचा नवीन भव्य प्लॅन्ट या परिसरात उभारला जात असून, यामुळे उत्पादनाला मोठी गती मिळणार आहे.

रिलायन्स (Reliance): रिलायन्स कंपनीनेही या ठिकाणी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे.

Advertisement

इंजेक्शन्स व औषध निर्मिती: याशिवाय 'किलिच' (Kilitch) या कंपनीच्या इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या नव्या प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे.

या बहुराष्ट्रीय व मोठ्या कंपन्यांच्या आगमनामुळे नाशिकमधील फार्मा क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होणार असून, स्थानिक व जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी निर्माण होणार आहेत.

अनुकूल वातावरण अन् पूरक व्यवसायांना चालना

नाशिकमधील पोषक हवामान, मुबलक पाणी पुरवठा आणि कुशल मनुष्यबळ यामुळे औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना नाशिक अधिक आकर्षित करत आहे. या नव्या प्रकल्पांमुळे केवळ थेट रोजगारच नव्हे, तर ट्रान्सपोर्ट, पॅकेजिंग, आणि इतर पूरक व्यवसायांनाही मोठी चालना मिळणार आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त अशोक बर्डे म्हणाले की, "फार्मा क्षेत्राच्या वाढीसाठी नाशिकमध्ये अतिशय सकारात्मक वातावरण आहे. ग्लॅनमार्क, रिलायन्ससारख्या कंपन्यांची गुंतवणूक जिल्ह्याच्या विकासास एक मैलाचा दगड ठरणार आहे."

जिल्ह्यात औषध विक्री दुकानांचे जाळे विस्तारत असून, रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध व्हावीत आणि आरोग्य सेवांचा दर्जा उंचावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दिंडोरी-आक्राळे परिसरातील या औद्योगिक क्रांतीमुळे नाशिकचा आर्थिक आणि औद्योगिक विकास एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे.

 

Comments

No comments yet.