५४ गावातील शेतीला मिळणार पाणीच पाणी... या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ...

Share:
Main Image
Last updated: 12-Oct-2026

 

धुळे, (प्रतिनिधी) १२ ऑक्टोबर - पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता परिवर्तनाची नवी पहाट उगवणार आहे. वर्षानुवर्षे पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत तापी नदीचे पाणी पोहोचविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेंतर्गत जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या (पीडीएन) मुख्य पाइपलाइन जोडणी कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील ५४ गावांमधील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा मोठा आधार मिळणार आहे.

१०५८ कोटींच्या प्रकल्पाला गती आणि उद्दिष्ट

शिंदखेडा तालुक्याच्या माथ्यावर असलेला दुष्काळाचा शिक्का कायमचा पुसून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्याचा आपला संकल्प असल्याचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. जामफळ धरण येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य पाइपलाइन जोडणी कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीसाठी तब्बल १,०५८ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रणालीद्वारे ५४ गावांमधील २६,९०७ हेक्टर लाभक्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी मुख्य पाइपलाइन जोडणीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे १ टीएमसी (२८.३२ दशलक्ष घनमीटर) पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, जून २०२७ पासून टप्प्याटप्प्याने सिंचनाचा लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत सुमारे ६ हजार हेक्टर क्षेत्रात पाणी वितरणाची व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आणि नियोजन

तांत्रिक प्रगती: प्रकल्पांतर्गत एकूण ७६६.१६४ किलोमीटर पाइपलाइनपैकी ५४८.८१ किलोमीटर पाइपचा पुरवठा झाला असून, ३२४.93 किलोमीटर पाइपलाइन अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे (प्रगती ४२.४१%).

Advertisement

पारदर्शक व कार्यक्षम पाणी वाटप: पारंपरिक कालव्यांऐवजी बंदिस्त पाइपलाइनमुळे पाण्याची गळती आणि अपव्यय मोठ्या प्रमाणावर टळणार आहे. या पाणीबचतीतून अतिरिक्त २,७०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

पाणी वापर संस्था: पाणी वितरणाच्या प्रभावी नियोजनासाठी लाभक्षेत्राची दोन भागांत आणि सहा झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून, ८९ पाणी वापर संस्थांची स्थापना केली जात आहे.

विस्तृत नियोजन: सुलवाडे-जामफळ प्रकल्पाबरोबरच तापी-बुराई योजनेलाही गती देण्यात येत असून, आगामी दोन ते अडीच वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार एकर क्षेत्राला शाश्वत सिंचन मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.

अधिकाऱ्यांना सूचना व पालकमंत्र्यांचे आवाहन

पाइपलाइन टाकताना शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल आणि जमिनीशी संबंधित बाबींमध्ये नियमानुसार मोबदला देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तसेच प्रकल्पाची सर्व कामे समन्वयाने, गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सख्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शाश्वत सिंचनामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पिकांचे नियोजन करता येईल, अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या संधी निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. "या प्रकल्पाचे खरे यश किती किलोमीटर पाइपलाइन टाकली यावर नव्हे, तर किती शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोहोचले आणि त्यांच्या जीवनात किती परिवर्तन घडले, यावर ठरणार आहे," असा विश्वास पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे.

 

Comments

No comments yet.