कोर्टाच्या त्या बॉण्ड वर सही केली का? आता इथून पुढे आंदोलन करणार नाही का? अभिजित दीपकेंनी स्पष्टच सांगितलं...

Share:
Main Image
Last updated: 11-Oct-2026

 

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ११ ऑक्टोबर - मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि कथित मतदार यादीतील गैरव्यवहाराविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या वतीने काढण्यात आलेल्या आंदोलनाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यासह शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सुटकेनंतर बोलताना अभिजीत दिपके यांनी पोलीस कारवाई आणि बंधनावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, "आम्ही भविष्यात आंदोलन करणार नाही असा कोणताही बॉण्ड किंवा हमीपत्र दिलेले नाही, आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार," असा स्पष्ट इशारा दिला आहे.

आंदोलनावर दिल्ली पोलिसांची धडक कारवाई

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यामुळे दिल्ली पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत प्रचंड धरपकड सुरू केली. आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ५०० हून अधिक आंदोलकांसह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात या नेत्यांना डांबण्यात आले होते. दरम्यान, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर एक वर्षासाठी शांतता राखण्याचे हमीपत्र (बॉण्ड) भरून घेतल्यानंतर या नेत्यांची सुटका करण्यात आली.

"आम्ही माघार घेणार नाही": अभिजीत दिपके

Advertisement

पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही आंदोलनात सहभागी न होण्याबाबत किंवा यापुढे आवाज न उठवण्याबाबत कोणत्याही प्रकारच्या बॉण्डवर स्वाक्षरी केलेली नाही. CJP चा लढा अजिबात थांबणार नाही आणि आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवू." त्यांच्या या भूमिकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आणि प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक दु:ख आणि वादाची पार्श्वभूमी

पोलिसांच्या कोठडीत असताना अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील सटूक पिंपरी गावात त्यांच्या आजीचे निधन झाले होते. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ जारी करून त्यांना घरी परतण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा केला होता, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला. यावर स्पष्टीकरण देताना दिपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी त्यांना फोन वापरू दिला नाही आणि वकिलांशीही संपर्क साधू दिला नाही. कुटुंबाच्या दुःखाच्या प्रसंगी गावी परतत असतानाही त्यांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली असून, सरकार हुकूमशाही पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुढील राजकीय संघर्ष अटळ

दिल्ली पोलिसांनी कडक प्रतिबंधक उपाययोजना केल्या असून, जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. CJP च्या आंदोलकांनी आणि इतर विरोधी नेत्यांनी निवडणुकांमधील कथित पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारविरोधी सूर अधिक तीव्र केला आहे. एका बाजूला पोलिसांनी आंदोलक नेत्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असताना, दुसरीकडे तरुणांनी आणि आंदोलकांनी दिलेला 'पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा' इशारा पाहता येत्या काळात दिल्लीतील राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

 

Comments

No comments yet.