कळवण, (प्रतिनिधी) ११ ऑक्टोबर - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवी गड (नांदुरी, ता. कळवण) येथे शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, दर्जेदार व तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, नाशिकच्या आरोग्य विभागामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेच्या कालावधीत आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, रुग्णवाहिका आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी पूर्ण झाली आहे.
४२ वैद्यकीय अधिकारी व ८० आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती
यात्रा कालावधीत भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे पथके व यंत्रणा तैनात करण्यात आली आहे:
वैद्यकीय अधिकारी: ४२
आरोग्य कर्मचारी व चालक: ८० कर्मचारी आणि ६ रुग्णवाहिका चालक
फिरती पथके: गर्दीच्या ठिकाणी सेवा देण्यासाठी ६ फिरती आरोग्य पथके
महत्त्वाची ठिकाणे: गडावरील ओपीडी सेवा, ट्रस्ट दवाखाना, राम मंदिर परिसर, छत्री पॉइंट, आरोग्य उपकेंद्र, पाणी शुद्धीकरण केंद्र परिसर आणि फ्युनिक्युलर ट्रॉली परिसर.
भाविकांना चक्कर येणे, अशक्तपणा, निर्जलीकरण, ताप, उलटी, जुलाब किंवा किरकोळ दुखापत झाल्यास त्वरित प्राथमिक उपचार मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असून, गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यासाठी ६ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि साथरोग प्रतिबंधावर विशेष भर
यात्रेदरम्यान लाखो भाविकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा योजना आणि पाणी शुद्धीकरण केंद्रांची पाहणी करण्यात आली आहे.
पाणी शुद्धीकरण व चाचणी: मडकपूर्णा ओहोळ येथील संकलन विहीर आणि मिक्सरची मोटार सुरू करून पाणी शुद्धीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ओ.टी. चाचणीद्वारे पाण्याची प्राथमिक तपासणी नियमितपणे करून अहवाल ठेवण्याचे निर्देश आहेत.
टी.सी.एल. पावडरबाबत खबरदारी: जुन्या टी.सी.एल. पावडरचा साठा (२५० किलो, क्लोरीन प्रमाण २२ टक्के) वापरू नये, असे सांगण्यात आले असून नव्याने प्राप्त झालेल्या १२५ किलो टी.सी.एल. पावडरची तपासणी करून वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
स्वच्छता व साथरोग नियंत्रण: भाविकांची होणारी गर्दी पाहता परिसरातील स्वच्छता, कचऱ्याचे संकलन, सांडपाण्याची विल्हेवाट आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. ताप, उलटी, जुलाब किंवा संसर्गजन्य आजारांच्या लक्षणांवर आरोग्य पथकांचे विशेष लक्ष राहणार आहे.
यात्रा व्यवस्थापनासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय बंगाळ यांची यात्रा प्रमुख म्हणून, तर नांदुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बैरागी यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाविकांसाठी प्रशासनाचे आवाहन:
भाविकांनी नेहमी स्वच्छ व सुरक्षित पाणी प्यावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी, उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे आणि प्रकृती अस्वस्थ वाटल्यास जवळच्या आरोग्य पथकाशी संपर्क साधावा.