दुष्काळाच्या झळा तीव्र... या जिल्ह्यातील ३ लाखाहून अधिक नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा...

Share:
Main Image
Last updated: 11-Oct-2026

 

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ११ ऑक्टोबर - जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे ठाकले आहे. तीव्र टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील १६१ गावांमधील ९६१ वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या ३ लाख ३१ हजार २३३ नागरिकांना १६९ टँकरद्वारे नियमित पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.

शासनाने राज्यातील २६५ तालुके दुष्काळी जाहीर केले असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांचा रोजच्या रोज आढावा घेतला जात आहे.

पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ६२ गावांना पाणी टंचाई

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथील ६२ गावांतील ३५१ वाड्या-वस्त्यांना ७४ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

तालुकानिहाय टँकरची स्थिती:

पाथर्डी: ६२ वर्षे गावे (३५१ वाड्या) - ७४ टँकर

कर्जत: २७ गावे (१९९ वाड्या) - २२ टँकर

शेवगाव: २८ गावे (१६८ वाड्या) - २० टँकर

नगर तालुका: १९ गावे (९१ वाड्या) - १९ टँकर

Advertisement

पारनेर (ग्रामीण व नगर परिषद): ५ गावे (६२ वाड्या) - १३ टँकर

जामखेड: ६ गावे (७ वाड्या) - ८ टँकर

संगमनेर: ८ गावे (१६ वाड्या) - ७ टँकर

श्रीगोंदा: ४ गावे (४९ वाड्या) - ४ टँकर

नेवासा: २ गावे (१८ वाड्या) - २ टँकर

१६९ टँकरचे नेटवर्क कार्यरत

जिल्ह्यात सध्या ४ शासकीय आणि १६५ खासगी अशा एकूण १६९ टँकरच्या साहाय्याने गावागावांत पाणी पोहोचवले जात आहे. उपलब्ध पाण्याचे स्रोत आणि टँकरची क्षमता यांचा समतोल साधून नागरिकांना नियमित पाणी मिळेल याची दक्षता घेतली जात आहे.

प्रशासनाची भूमिका:

"दुष्काळाच्या या कठीण काळात नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे, विशेषतः पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शासन आणि प्रशासन पूर्ण ताकदीने टंचाईग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभे आहे." — जिल्हा प्रशासन, अहिल्यानगर

 

Comments

No comments yet.