अखेर यंत्रणा जागी झाली... सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिर परिसराचा असा होणार कायापालट...

Share:
Main Image
Last updated: 11-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ११ ऑक्टोबर - सिन्नरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे मानबिंदू असलेल्या १२व्या शतकातील प्रसिद्ध गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धन आणि परिसर विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्तीपासून ते भाविकांसाठीच्या सुविधेपर्यंतच्या विविध उपाययोजनांची माहिती विभागाचे महासंचालक यादविर सिंह रावत यांनी पत्राद्वारे दिली आहे.

संरचनात्मक दुरुस्ती आणि निधीची तरतूद

गोंदेश्वर मंदिराचे शिखर, नंदी मंडप आणि मुख्य मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठीचे तांत्रिक अंदाजपत्रक अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. ही सर्व महत्त्वाची कामे चालन चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रत्यक्षात हाती घेण्यात येणार असल्याचे एएसआय (ASI) कडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संवर्धन कामांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) ₹१० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, या निधीची औपचारिक प्राप्ती अद्याप प्रलंबित असून, तो लवकरात लवकर प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सूर्याभिषेकाचे पावित्र्य आणि नियमांची कठोर अंमलबजावणी

गोंदेश्वर मंदिराचे एक प्रमुख आणि विशेष आकर्षण म्हणजे येथील 'सूर्याभिषेक' होय. या खगोलीय वैशिष्ट्याचे आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी मंदिर परिसरातील बांधकामांवर कायद्यानुसार कडक नियंत्रण ठेवले जाणार आहे. मंदिराच्या संरक्षित हद्दीपासून १०० मीटरचा प्रतिबंधित परिसर आणि त्यापुढील २०० मीटरचा नियंत्रित परिसर यांमधील नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. प्रतिबंधित क्षेत्रात नवीन बांधकामांना पूर्णपणे मज्जाव असेल, तर नियंत्रित क्षेत्रात संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक राहणार आहे. मंदिराचे दृश्यवैभव आणि सूर्याभिषेकाचे खगोलीय संरेखन कायम राहावे, यासाठी विभाग पूर्णपणे सतर्क आहे.

Advertisement

भाविकांसाठी सुविधा आणि परिसर सुशोभीकरण

केवळ वास्तूची दुरुस्तीच नव्हे, तर मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधांवरही भर दिला जात आहे. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी बाके आणि कचरापेट्या यांसारख्या मूलभूत सुविधांची नियमित देखभाल केली जात आहे. याशिवाय पायवाटा, पाणीपुरवठा आणि परिसर सुशोभीकरणाच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली आणि सूर्याभिषेकाची माहिती देणारे सांस्कृतिक फलक लवकरच उभारण्यात येणार आहेत. तसेच, व्यावसायिक हालचालींवर नियंत्रण ठेवून मंदिराचे पावित्र्य राखण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

प्रत्यक्ष कामांच्या अंमलबजावणीकडे लक्ष

गोंदेश्वर मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून महाराष्ट्राच्या मध्ययुगीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यामुळे प्रस्तावित कामे वेळेत सुरू होणे आणि कामांचा दर्जा सर्वोच्च राखणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे निर्माण झालेली ही आशा प्रत्यक्षात उतरण्यासाठी ₹१० कोटींचा निधी लवकरात लवकर हातात पडणे गरजेचे आहे. सिन्नरच्या या ऐतिहासिक वारशाचे जतन करतानाच भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया:

“गोंदेश्वर मंदिर हा सिन्नरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अमूल्य ठेवा आहे. या मंदिराचे मूळ स्थापत्यवैभव, सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक वारसा जतन होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत असून, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ आश्वासनांपुरते न थांबता मंजूर निधी प्रत्यक्ष उपलब्ध होऊन संवर्धनाची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील.”

 

Comments

No comments yet.