कार्यालयातील सहकाऱ्याकडून महिलेचा नऊ महिने पाठलाग... गोविंदनगरमधील धक्कादायक प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 10-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑक्टोबर -  शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांचा विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. लाखलगाव परिसरात वहिवाटीच्या रस्त्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांनी देराणी-जेठाणीला मारहाण करत विनयभंग केला, तर दुसऱ्या घटनेत कार्यालयातील सहकाऱ्यानेच एका विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनुक्रमे आडगाव आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लाखलगाव : कचरा टाकण्यावरून वाद, दोन जावांचा विनयभंग

पहिली घटना लाखलगाव येथील चेहडीरोड भागात घडली. पीडित महिला रविवारी (दि. ४) घरातील झाडलोट करून परिसरातील रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी गेली होती. त्यावेळी शेजारी राहणारे राजेंद्र मुठाळ, शंकर मुठाळ आणि प्रतिक मुठाळ यांनी तिला अडवले. "हा आमचा रस्ता आहे, तुम्ही येथून जायचे नाही," असे म्हणत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

Advertisement

पीडितेने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून महिलेचा मुलगा, सून आणि तिची जाऊ मदतीसाठी धावून आले. मात्र, संतप्त झालेल्या संशयितांनी वाद वाढवत पीडितेसह तिच्या जेठाणीचाही विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील पुढील तपास करत आहेत.

गोविंदनगर : कार्यालयातील सहकाऱ्याकडून नऊ महिने पाठलाग

दुसरा प्रकार गोविंदनगर व सदाशिवनगर परिसरात घडला. पाथर्डी फाट्यावरील ज्ञानेश्वरनगर येथे राहणारा नागेश स्वामी हा एका खासगी कार्यालयात पीडित विवाहितेसोबत काम करतो. संशयित नागेश गेल्या ९ ते १० महिन्यांपासून पीडितेला सतत मानसिक त्रास देत होता तसेच तिचा वेळोवेळी पाठलाग करत होता.

त्याने कार्यालयात तसेच पार्किंगच्या ठिकाणी गाठून पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संशयिताच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नागेश स्वामीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गाढवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Comments

No comments yet.