नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगडावर जाण्यासाठी हे नवे नियम लागू... वाहतूक या पर्यायी मार्गाने...

Share:
Main Image
Last updated: 10-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑक्टोबर - श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेच्या काळात होणारी भाविकांची विक्रमी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गडावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून केवळ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसनाच गडावर प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय, पायथ्याशी असलेल्या नांदुरी गाव व परिसरातील घाटरस्त्यावर कोंडी टाळण्यासाठी जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालानुसार, अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ अन्वये यासंदर्भातील अंतिम अधिसूचना जारी केली आहे.

या कालावधीत लागू राहणार वाहनांवर निर्बंध

सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव दि. ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान साजरा होत असून, दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खालील कालावधीत निर्बंध लागू राहतील:

पहिला टप्पा (नवरात्रोत्सव): दि. ९ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजेपासून ते २० ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत.

दुसरा टप्पा (कोजागिरी पौर्णिमा): दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ (जड वाहनांसाठी रात्री १२) वाजेपासून ते २६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत.

घाटरस्त्यातील सुरक्षिततेसाठी खासगी वाहनांना 'नो एन्ट्री'

नांदुरी ते सप्तशृंगी गड हा घाटरस्ता अत्यंत अरुंद आणि तीव्र वळणावळणाचा आहे. सण-उत्सवाच्या काळात खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या वाढल्यास गडावर गंभीर वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मालवाहू वाहने, ऑटोरिक्षा, खासगी चारचाकी व दुचाकी अशा सर्व खासगी वाहनांना गडावर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भाविकांना गडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथून केवळ एसटी बसेसचा वापर करावा लागणार आहे.

Advertisement

नांदुरी परिसरातील अवजड वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग निश्चित

नांदुरी गावातील रस्ते अरुंद असल्याने उत्सवाच्या काळात बाहेरील जड व मालवाहू वाहनांमुळे कोंडी होऊ नये, यासाठी विविध चौकांमधून वाहतूक वळवण्यात आली आहे:

पाचकंदील चौक (देवळा): देवळा शहराकडून कळवणमार्गे नांदुरीकडे जाणारी अवजड वाहने सोग्रस फाटा–पिंपळगाव मार्गे पुढे जातील.

संताजी चौक (अभोणा): अभोणा बाजूकडून नांदुरीमार्गे नाशिककडे जाणारी जड वाहने देवळा–सोग्रस फाटा मार्गाने वळविण्यात आली आहेत.

एस. बी. आय. कॉर्नर चौक (कळवण): सटाणा शहराकडून नांदुरीमार्गे नाशिककडे जाणारी अवजड वाहतूक देवळा–सोग्रस फाटा मार्गे धावेल.

बिरसा मुंडा चौक (वणी चौफुली): नाशिक व सापुतारा बाजूकडून नांदुरीमार्गे कळवण किंवा अभोणाकडे जाणारी वाहने पिंपळगाव मार्गे देवळा बाजूकडे वळविण्यात येतील.

उल्लंघन केल्यास 'भारतीय न्याय संहिते'नुसार कारवाई

प्रशासनाने निश्चित केलेल्या या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे किंवा या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर 'भारतीय न्याय संहिता, २०२३' (BNS) आणि 'मोटार वाहन कायदा, १९८८' मधील कठोर तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिला आहे. दरम्यान, परिस्थितीनुसार या निर्बंधांमध्ये तात्पुरती शिथिलता देण्याचे अथवा आपत्कालीन बदल करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाने स्वतःकडे राखले आहेत.

 

Comments

No comments yet.