शिवसेना आणि धनुष्यबाण याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात काय झालं?

Share:
Main Image
Last updated: 21-Jan-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २१ जानेवारी - गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा ठरलेला शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा (धनुष्यबाण) खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (२१ जानेवारी) या प्रकरणावर अंतिम सुनावणी होऊन निकाल लागण्याची अपेक्षा होती, मात्र ऐनवेळी सुनावणी टळल्याने ठाकरे गटाला पुन्हा एकदा 'तारीख पे तारीख'चा झटका बसला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

नेमकं काय घडलं न्यायालयात?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हाबाबतच्या वादावर आज सलग सुनावणी होणार होती. कोर्टाने यापूर्वीच २१ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती आणि ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांच्या वकिलांना युक्तिवादासाठी प्रत्येकी ५ तासांचा वेळ देण्यात येणार होता. मात्र, आज सुनावणी सुरू होण्यापूर्वीच सॉलिसिटर जनरल यांनी दुसऱ्या एका महत्त्वाच्या प्रकरणाचे कारण देत न्यायालयात उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली. दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यानंतर, न्यायालयाने ही सुनावणी दोन दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी घेण्याचे ठरवले.

Advertisement

महापालिका निवडणुकांनंतर निकालाची उत्सुकता शिगेला
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. महापालिकेतील सत्ता समीकरणांवर या निकालाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जर निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला, तर महापालिकेतील सध्याचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलू शकते. या पार्श्वभूमीवर आज होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात होती, मात्र ती पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी निकाल?
योगायोगाने, पुढील सुनावणीची तारीख २३ जानेवारी आहे, जो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या सुनावणीला भावनिक आणि राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Comments

No comments yet.