नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑक्टोबर - राज्यातील जलतरणपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने एशियन स्विमिंग अकॅडमी, महाराष्ट्र जलतरण संघटना आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये आयोजित ‘१st Short Course Senior and Lower Age Group Maharashtra State Aquatic Championship – 2026’ या दोन दिवसीय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ५०० हून अधिक जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून, गंगापूर रोडवरील नाशिक महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव येथे स्पर्धेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि रतन लथ यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी नगरसेविका स्वाती भामरे, अजय बोरस्ते, अजिंक्य फरांदे, अनिल भालेराव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
महाराष्ट्र जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांच्या आयोजनातून तसेच एशियन स्विमिंग अकॅडमीचे संचालक दीपक कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये एकूण ११६ जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विविध वयोगटांतील खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याची संधी मिळत आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून निवड होणारे जलतरणपटू अहमदाबाद येथे आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर पात्रता सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे राज्यातील नवोदित आणि अनुभवी जलतरणपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे.
स्पर्धेच्या आयोजनाबाबत महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी समाधान व्यक्त केले. तर एशियन स्विमिंग अकॅडमीचे संचालक दीपक कुमार सिंह यांनी स्पर्धेची माहिती देताना राज्यभरातील खेळाडूंचा मिळालेला प्रतिसाद आणि राष्ट्रीय स्तरावरील संधी यांचे महत्त्व अधोरेखित केले.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा दुसरा दिवस रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. पहिल्या दिवशी खेळाडूंनी दाखविलेला उत्साह आणि जलतरणातील कौशल्यपूर्ण कामगिरी यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.