नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑक्टोबर - लहान व्यावसायिकांना उद्योगवाढीसाठी सहज आणि भरघोस भांडवल मिळवून देण्याच्या नावाखाली नाशिकमध्ये एका कांदा व्यापाऱ्याला तब्बल ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या दोन तासांत ५० लाखांचे १ कोटी रुपये करून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी ही फसवणूक केली. या प्रकरणी दिल्ली येथील मुख्य सूत्रधारासह चार जणांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचतारांकित हॉटेलमध्ये सेमिनारचा बनाव
लासलगाव (ता. निफाड) येथील पिंपळगाव नजीक राहणारे अक्षय संजय थेटे (वय २९) हे कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यावसायिक गुंतवणुकीच्या शोधात असताना थेटे यांचे मित्र प्रशांत जाधव यांनी त्यांना एका कथित गुंतवणूक योजनेची माहिती दिली होती. दिल्ली येथील संतोष मिस्त्री याने नाशिकमधील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये 'ट्रेड प्रॉफिट फंड' या विषयावर एक विशेष सेमिनार आयोजित केला होता. या सेमिनारच्या माध्यमातून व्यावसायिकांना अल्प मुदतीत प्रचंड परतावा देणाऱ्या योजनांची भुलथाप देण्यात आली होती.
दोन तासांत दुप्पट रकमेचे आमिष
संशयितांनी थेटे यांना विश्वासात घेत सांगितले की, "जर तुम्ही ५० लाख रुपयांची रोकड गुंतवली, तर अवघ्या दोन तासांच्या आत थेट १ कोटी रुपये आरटीजीएस (RTGS) द्वारे तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जातील." या व्यवहारात मध्यस्थाचे २० लाख रुपये कमिशन कापून थेटे यांच्या खात्यावर निव्वळ ८० लाख रुपये जमा होतील, अशी खोटी बतावणी भामट्यांनी केली. अवघ्या दोन तासांत ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा दिसल्याने थेटे या आमिषाला बळी पडले. त्यांनी तातडीने नातेवाईक व मित्रांकडून हातउसने पैसे गोळा करत ५० लाख रुपयांची मोठी रक्कम जमवली.
दहीपुलावरील कार्यालयात बोलावून रोख मोजली
३० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अक्षय थेटे हे आपल्या मित्रांसह नाशिक शहरातील दहीपुल परिसरातील कानडे मारुती लेन येथे असलेल्या 'जय अंबे एंटरप्रायझेस'च्या कार्यालयात पोहोचले. तेथे हजर असलेल्या विकी नावाच्या व्यवस्थापकाने नोटा मोजण्याच्या मशीनद्वारे थेटे यांच्याकडील ५० लाखांची रोकड मोजून घेतली. पैसे स्वीकारल्यानंतर थेटे यांना अधिकृत पावती देण्यात आली. "दोन तासांत तुमच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे १ कोटी जमा होतील, तोपर्यंत तुम्ही खाली थांबून चहा-पाणी घ्या," असे सांगत संशयितांनी त्यांना कार्यालयाबाहेर पाठवले.
फोन बंद आणि भामटे पसार
दोन तास उलटून गेल्यानंतरही बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचा कोणताही संदेश न आल्याने थेटे यांनी मुख्य सूत्रधार संतोष मिस्त्री याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. सुरुवातीला मिस्त्रीने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यानंतर काही वेळातच स्वतःचा फोन बंद करून टाकला.
संशय बळावल्याने थेटे आणि त्यांचे मित्र दुपारी ३ वाजेच्या सुमारास पुन्हा इमारतीवरील कार्यालयात गेले. मात्र, तेथील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कार्यालयाला कुलूप होते आणि आत कोणीही नव्हते. संशयित ५० लाखांची रोकड घेऊन मागच्या दाराने पसार झाले होते. थेटे यांनी तात्काळ संबंधित इमारतीच्या गाळा मालकाकडे चौकशी केली असता, हा गाळा केवळ तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने घेण्यात आल्याचे समोर आले.
चौघांवर गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अक्षय थेटे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष मिस्त्री (रा. दिल्ली), 'जय अंबे एंटरप्रायझेस'चा मालक विजयकुमार पटेल, कार्यालयातील व्यवस्थापक विकी आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध भादंविच्या फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून या टोळीने अशाच प्रकारे इतर व्यावसायिकांनाही गंडा घातला आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार आढावू करत आहेत. भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही संशयास्पद योजनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.