मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर... सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा आणि...

Share:
Main Image
Last updated: 10-Oct-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), १० ऑक्टोबर २०२६ -

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'सिंहस्थ कुंभमेळ्याच्या' तयारीचा तातडीने आढावा घेण्यासाठी आणि ग्रामविकासाला नवी दिशा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. ११ ऑक्टोबर २०२६) नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

नाशिक महापालिका व जिल्हा प्रशासनामार्फत हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, त्यांच्या गतीचा आणि नियोजनाचा प्रत्यक्ष आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.

याच दौऱ्यात ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक 'लोकप्रतिनिधींचा महाकुंभ' पार पडणार असून, राज्यभरातील १० हजारांहून अधिक सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची उपस्थिती या मेळाव्यात असणार आहे.

सिंहस्थ २०२७ कामांचा वेग वाढवण्याचे आव्हान

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मधील सिंहस्थासाठी विविध पायाभूत सुविधांची आणि रस्ते विकासकामांची हजारो कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी कामांचा मंदावलेला वेग आणि नियोजनातील त्रुटींवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

 महापालिका आणि प्रशासनासमोरील हे आव्हान लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यादरम्यान कामांना गती देण्यासाठी आणि उर्वरित कामांची वेळेत पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

मोदी ग्राउंडवर रंगणार 'लोकप्रतिनिधींचा महाकुंभ'

ग्रामविकासाला गती देणे आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाश्वत जलव्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील मोदी ग्राउंडवर हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement

 * मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० चा शुभारंभ:
या कार्यक्रमात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६' च्या विजेत्या ग्रामपंचायतींचा बक्षीस वितरण समारंभ आणि आदर्श सरपंचांचा गौरव केला जाणार आहे. याच मंचावरून अभियानाच्या पुढील टप्प्याचा म्हणजेच 'अभियान २.० (२०२६-२७)' चा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री करणार आहेत.

 * १० हजार प्रतिनिधींची हजेरी:
राज्यभरातील सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.

'दुष्काळावर मात, जलसमृद्ध गावाचा संकल्प' :
सरपंच परिसंवाद

राज्यात निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावपातळीवर पाण्याचे नियोजन कसे करावे, यावर मार्गदर्शन करण्यासाठी 'सरपंच परिसंवाद' आयोजित करण्यात आला आहे.

 * वॉटर बजेट व जलव्यवस्थापन:
गावातील पा उपलब्धता, साठवणूक आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येक गावाने 'वॉटर बजेट' (पाण्याचे अंदाजपत्रक) तयार करण्यावर भर दिला जाईल.

 * भूजल पुनर्भरण व जलसंधारण:
पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, भूगर्भातील जलसाठा वाढवणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभेल.

 * टंचाई निवारण व चारा नियोजन:
दुष्काळी स्थितीत ग्रामपंचायतींच्या पातळीवर चारा पुरवठा, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि जनजागृती मोहिमा राबवण्याची रणनीती आखण्यात येईल.

प्रशासनाकडून तयारी पूर्ण : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेशी सातत्याने संपर्क साधून संपूर्ण नियोजनाचा आढावा घेतला आहे.

तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मोदी ग्राउंडवर प्रत्यक्ष भेट देऊन पार्किंग, उपस्थितांची ये-जा, सुरक्षा आणि इतर सर्व सोयी-सुविधांची पाहणी करत तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.

Comments

No comments yet.