नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑक्टोबर - स्वतःच्या कष्टाच्या पैशांतून घेतलेला फ्लॅट दिराच्या नावावर करून देण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका ३५ वर्षीय परिचारिकेने (नर्स) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित पतीला तात्काळ अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी पतीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकी घटना काय?
दीपाली अनिल पवार (वय ३५, रा. क्लासिक निकेतन अपार्टमेंट, महात्मानगर, नाशिक) असे मृत परिचारिकेचे नाव आहे. दीपाली या नाशिक जिल्ह्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा विवाह २०१४ मध्ये अनिल पवार याच्याशी झाला होता. संशयित पती अनिल हा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरीस आहे.
दीपाली यांनी आपल्या स्वकमाईतून अहिल्यानगर (अहमदनगर) येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, हा फ्लॅट पती अनिल आणि सासरचे मंडळी त्याचा भाऊ (दीर) सुनील पवार याच्या नावावर करून देण्यासाठी दीपाली यांच्यावर सतत दबाव आणत होते. या कारणावरून सासरच्या मंडळींकडून त्यांना वारंवार शिवीगाळ, शारीरिक छळ आणि मानसिक त्रास दिला जात होता.
जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून पळ
मिळालेल्या माहितीनुसार, त्रासाला कंटाळून दीपाली यांनी टोकाचे पाऊल उचलले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी पती अनिल याला उपचारासाठीची अनामत रक्कम (डिपॉझिट) भरण्यास सांगितले. मात्र, पतीने पैसे भरण्यास थेट नकार दिला आणि तिला जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्यांवर असहाय्य अवस्थेत सोडून तो तिथून निघून गेला.
या घटनेची माहिती मिळताच दीपाली यांच्या माहेरच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिला पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान ५ ऑक्टोबर रोजी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
पतीला अटक; सात जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मृत दीपाली यांचे ६६ वर्षीय वडील सयाजी रामदास गायकवाड (रा. त्र्यंबकेश्वर) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पोलिसांनी पतीसह एकूण सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित:
अनिल पवार (पती – अटक)
सुशीला पवार (सासू)
सोन्याबापू पवार (सासरे)
सुनील पवार (दीर)
सुवर्णा पवार (दिराणी)
रेखा धोत्रे (नणंद)
किशोर धोत्रे (नंदोई)
(सर्व रा. घारगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)
सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. एका सरकारी कर्मचाऱ्यानेच आपल्या परिचारिका पत्नीचा मालमत्तेसाठी छळ करून तिच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याने नाशिक परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.