महारेराचा मोठा दणका... नाशिकच्या या बिल्डरची ५ कोटींची संपत्ती... बांधकाम क्षेत्रात खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 09-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ९ ऑक्टोबर - घरखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या आणि महारेराच्या (MSRTC/MahaRERA) आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांविरोधात प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कडक कारवाई सुरू केली आहे. नाशिक येथील प्रसिद्ध 'वसुंधरा कन्स्ट्रक्शन'चे व्यावसायिक अशोक तलवारे आणि हेमलता तलवारे यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १२:३० वाजता अपर तहसील कार्यालयात जाहीर लिलाव होणार आहे. नाशिकच्या इतिहासात महारेराच्या आदेशावरून एखाद्या मोठ्या बिल्डरच्या मालमत्तांचा असा जाहीर लिलाव होण्याची ही बहु बहुधा पहिलीच मोठी आणि ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) न्यायनिर्णय अधिकाऱ्यांनी 'वसुंधरा कन्स्ट्रक्शन' (प्रथमेश, थत्ते नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांच्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत वसुलीचे स्पष्ट आदेश दिले होते.

या आदेशानुसार:

 * मूळ रक्कम: ₹२२ लाख ४२ हजार

 * १ सप्टेंबर २०२३ पर्यंतचे व्याज: ₹२७ लाख ७७ हजार ५३९

 * पुढील व्याज: १ सप्टेंबर २०२३ पासून प्रत्यक्ष वसुली होईपर्यंतच्या मूळ रकमेवरील पुढील व्याज.

ही सर्व रक्कम महारेराच्या आदेशानुसार शासनाकडे जमा करणे बिल्डर तलवारे यांच्यावर बंधनकारक होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी सदर रक्कम भरली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी नाशिक यांच्या सूचनेनुसार महसूल प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले.

कोणत्या मालमत्तांचा होणार लिलाव?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कडक वसुली तरतुदींनुसार महसूल विभागाने बिल्डरच्या मौजे नाशिक-१ आणि मौजे नाशिक-३ मधील मोक्याच्या भूखंडांवर जप्ती आणली आहे. या सर्व संपत्तीची एकूण सरकारी किंमत ₹४ कोटी ९५ लाख १८ हजार २०३ (सुमारे ५ कोटी रुपये) निश्चित करण्यात आली आहे.

Advertisement

जप्त केलेल्या मालमत्तांचा तपशील खालीलप्रमाणे:

 * मौजे नाशिक-१: सर्व्हे नं. ६७७/८/१/४ (क्षेत्र: ३७५.०० चौ.मी.)

 * मौजे नाशिक-३: सर्व्हे नं. २२८/१अ/२/अ मधील प्लॉट क्र. ६ (क्षेत्र: ५००.६१ चौ.मी.)

 * मौजे नाशिक-३: सर्व्हे नं. २२८/१अ/२/अ मधील प्लॉट क्र. ७ (क्षेत्र: ५००.६१ चौ.मी.)

 * मौजे नाशिक-३: सर्व्हे नं. २२८/१अ/२/अ मधील प्लॉट क्र. ८ (क्षेत्र: ५००.६१ चौ.मी.)

 * मौजे नाशिक-३: सर्व्हे नं. २२८/१अ/२/अ मधील प्लॉट क्र. ९ (क्षेत्र: ५००.६१ चौ.मी.)

अपर तहसीलदार अमोल निकम यांचे आवाहन

ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असून, लिलाव २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता अपर तहसील कार्यालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व बोलीधारकांनी, लिलावात भाग घेण्याचा अर्ज, स्थावर मालमत्तेची निश्चित केलेली अपसेट प्राईज (हातची किंमत), आवश्यक ती अनामत रक्कम (EMD) आणि लिलावाच्या नियम व अटींची माहिती मिळवण्यासाठी अपर तहसीलदार कार्यालय, नाशिक येथे वेळेत संपर्क साधावा, असे अधिकृत आवाहन अपर तहसीलदार अमोल निकम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

नाशिकमधील बिल्डर लॉबीत खळबळ

ग्राहकांचे पैसे थकवून महारेराच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या विकासकांसाठी ही कारवाई एक मोठा इशारा मानली जात आहे. नाशिकमध्ये महारेराच्या आदेशावरून महसूल विभागाने एवढी मोठी मालमत्ता जप्त करून तिची थेट लिलाव प्रक्रिया राबवण्याची ही पहिलीच घटना असल्याने, नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात आणि बिल्डर लॉबीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या कठोर कारवाईमुळे आता फसवणूक झालेल्या अनेक सर्वसामान्य घरखरेदीदारांना न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

 

Comments

No comments yet.