थकबाकीदाराला जोरदार दणका... ३ लाख भरले नाही... आता थेट ५८ लाखांच्या मालमत्तेचा लिलाव होणार...

Share:
Main Image
Last updated: 09-Oct-2026

 

 

नाशिक (प्रतिनिधी), ९ ऑक्टोबर २०२६ -

 

कानपूर येथील 'सूक्ष्म व लघु उद्यम फॅसिलिटी कौन्सिल'च्या आयुक्तांनी दिलेल्या वसुली आदेशाचे पालन न केल्यामुळे, नाशिक येथील एका थकबाकीदार मालमत्तेचा २२ ऑक्टोबर २०२६ रोजी अपर तहसील कार्यालयाकडून जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील 'निर्माण विलास को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.' येथील रहिवासी रौनक शैलेश मजेठिया आणि शीतल शैलेश मजेठीया यांच्याकडून ३ लाख २३ हजार ७५७ रुपये इतकी थकीत रक्कम वसूल करण्याचे आदेश कौन्सिलने जिल्हाधिकारी, नाशिक यांना दिले होते.

जमीन महसूल कायद्यानुसार कारवाई

संबंधित व्यक्तींनी ठरवून दिलेली रक्कम शासनजमा न केल्यामुळे, 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६' च्या वसुली तरतुदींनुसार त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

लिलावात काढण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील:

 * मालमत्तेचे ठिकाण: मौजे नाशिक, सर्व्हे नं. ७२३/४/३/५, प्लॉट क्रमांक ७

 * क्षेत्रफळ: ८४.१८ चौ.मी.

 * निश्चित सरकारी किंमत (Base Price): ५८ लाख ३३ हजार ६७४ रुपये

२२ ऑक्टोबरला अपर तहसील कार्यालयात लिलाव

या जप्त मिळकतीचा जाहीर लिलावाद्वारे लिलाव करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अपर तहसील कार्यालय, नाशिक येथे वेळ निश्चित करण्यात आली आहे.

इच्छुकांसाठी आवाहन:

या लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी किंवा व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, मालमत्तेची ठरवलेली हातची किंमत, अनामत रक्कम (EMD) तसेच लिलावाच्या इतर अटी व शर्तींची माहिती मिळवण्यासाठी अपर तहसीलदार कार्यालय, नाशिक येथे त्वरित संपर्क साधावा, असे अधिकृत आवाहन अपर तहसीलदार अमोल निकम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Comments

No comments yet.