नाशिक (प्रतिनिधी), ९ ऑक्टोबर २०२६ -
कायदेशीर प्रक्रियेद्वारे बँकेने जप्त केलेल्या आणि कोर्ट रिसिव्हरची नियुक्ती असलेल्या रो-हाऊसला लावलेले सील तोडून बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी मायलेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेने तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकाला दमदाटी व शिवीगाळ करत संशयितांनी हे कृत्य केले. याप्रकरणी नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रत्नाबाई बाळकृष्ण यशवंते (वय ४९), विशाल बाळकृष्ण यशवंते (वय ३३) आणि अमोल बाळकृष्ण यशवंते (वय २९, तिघे रा. रो-हाऊस नं. १, गुरुकृपा सोसायटी, विडी कामगारनगर, अमृतधाम, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित मायलेकांची नावे आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
याबाबत मुंबईतील बँक कर्मचारी बाळकृष्ण सीतारामुलू श्रीपती यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २४ सप्टेंबर रोजी श्रीपती यांनी बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांसह अमृतधाम परिसरातील गुरुकृपा सोसायटीत असलेल्या यशवंते कुटुंबीयांच्या रो-हाऊसचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताबा घेतला होता. या कारवाईदरम्यान रितसर पंचनामा आणि छायाचित्रण (Photographs) करून घराला कुलूप व बँकेचे सील ठोकण्यात आले होते. तसेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आला होता.
सील तोडले अन् रक्षकाला धमकावले
बँकेने ताबा घेतलेल्या त्याच दिवशी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास संशयित रत्नाबाई यशवंते व त्यांच्या दोन्ही मुलांनी रो-हाऊसजवळ जाऊन तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर बँकेने दरवाजाला लावलेले सील आणि कुलूप तोडून सर्वांनी घरात बेकायदेशीर प्रवेश केला. याप्रकरणी बँक अधिकाऱ्याने तातडीने आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली.
पोलिसांनी संशयित तिघांविरोधात अनाधिकाराने प्रवेश करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार राजुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.