खाकीच्या आवारातच मोठी हातसफाई.. नाशिक शहर पोलीस मुख्यालयातच...

Share:
Main Image
Last updated: 09-Oct-2026

 

१२ लाखांचे गौडबंगाल काय....

नाशिक (प्रतिनिधी), ९ ऑक्टोबर २०२६ –

नाशिक शहर पोलीस मुख्यालयातील जुन्या इमारती पाडण्याचे आणि त्यातील भंगार विकण्याचे अधिकृत टेंडर मिळाल्याची खोटी बतावणी करून एका व्यावसायिकाला तब्बल १२ लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश दिनकर कापसे (वय ४२, रा. देवी वागेश्वरी बिल्डिंग, मेहेरधाम स्टॉप, पेठ रोड, नाशिक) यांनी या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित विनय सुरेश शेवाळे (रा. पेरेजपूर, ता. साक्री, जि. धुळे, सध्या रा. नाशिक) आणि त्याचा साथीदार श्री. पाटील (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



टेंडरच्या नावाखाली १२ लाख २० हजारांची उकळती

तक्रारदार सुरेश कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जून २०२० मध्ये संशयित विनय शेवाळे आणि पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. नाशिक शहर पोलीस मुख्यालय आवारातील जुन्या इमारती पाडण्याचे शासकीय टेंडर आपल्याला मिळाले असल्याचा बनाव या दोघांनी रचला. "हे पाडकामाचे टेंडर आणि त्यातील जुने मटेरियल (रॉ मटेरियल/भंगार) विक्रीचे उपकंत्राट (सब-कॉन्ट्रॅक्ट) आम्ही तुम्हाला देतो," असा विश्वास संशयितांनी कापसे यांना दाखवला.

Advertisement

या कामाच्या मोबदल्यात संशयितांनी कापसे यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली. त्यानुसार त्र्यंबक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालयाच्या आवारात दोन साक्षीदारांसमक्ष कापसे यांच्याकडून तब्बल १२ लाख २० हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारण्यात आले.

ऑनलाइन टेंडर दुसऱ्यालाच मिळाल्याचे उघड

पैसे दिल्यानंतर काही दिवसांनी नाशिक शहर पोलीस मुख्यालयातील जुन्या इमारती पाडण्याचे आणि त्याचे साहित्य विक्री करण्याचे अधिकृत टेंडर ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अन्य एका व्यक्तीला मिळाल्याची माहिती कापसे यांना समजली.

आपल्याला कामाचे कोणतेही सब-कंत्राट न मिळाल्याने आणि आपली दिशाभूल झाल्याचे लक्षात आल्यानंतर कापसे यांनी तातडीने संशयित विनय शेवाळे याच्याकडे दिलेले १२ लाख २० हजार रुपये परत मागितले.



धनादेश न वटल्याने फसवणूक उघडकीस

पैसे परत मागितल्यानंतर संशयित विनय शेवाळे याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दबाव वाढल्यावर त्याने नोटरी समजूतपत्र व नोटरी उसनवार पावती करून दिली आणि तेवढ्याच रकमेचे बँक धनादेश (चेक) कापसे यांच्याकडे दिले.

मात्र, कापसे यांनी सदर धनादेश बँकेत वटवण्यासाठी जमा केले असता, बँक खात्यात पुरेसा निधी नसल्यामुळे (इनकॅश न होता) ते बाउन्स झाले. त्यानंतर आजतागायत संशयितांनी कापसे यांचे पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.

वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने शेवटी कापसे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी संशयित विनय सुरेश शेवाळे आणि त्याचा साथीदार श्री. पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २७३/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस हेडकॉन्स्टेबल कडाळे (ब.नं. ११४९) यांनी गुन्हा नोंदवला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) शरद सोनवणे करत आहेत.

 

Comments

No comments yet.