त्र्यंबकेश्वरचे नगरसेवक एकवटले...  पालकमंत्री महाजनांकडे केली ही मागणी...  काय आहे पत्रात?

Share:
Main Image
Last updated: 09-Oct-2026

 

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी), ९ ऑक्टोबर २०२६ -

२०२७-२८ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत त्रिंबक नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

त्रिंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी सोमनाथ तुंगार यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक व नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे महत्त्वाचे निवेदन सादर केले.


नगरपरिषदेने निवेदनात मांडलेले ४ मुख्य मुद्दे:
१. शेतकऱ्यांना अतिरिक्त भूसंपादन मोबदला मिळावा:
गोदावरी नदीवर २.५ किलोमीटर लांबीचे नवीन घाट उभारणे आणि विकास रस्ते तयार करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत.

 मात्र, यासाठी देण्यात आलेला मोबदला अत्यंत तुटपुंजा असल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना तातडीने अतिरिक्त आणि योग्य मोबदला देण्यात यावा.

 

Advertisement

२. साधुग्रामसाठी अनावश्यक जमीन त्वरित मुक्त करा:
कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी सुमारे ६७० एकर अतिरिक्त जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या जागेचा वापर करताना सूक्ष्म नियोजन (Micro-planning) करून कमीत कमी जमिनीचा वापर करावा आणि अतिरिक्त किंवा अनावश्यक असलेली जमीन तातडीने अधिग्रहीत मुक्त करून मूळ मालकांना परत करावी.


३. रस्ता रुंदीकरणात नगरपरिषदेला विश्वासात घ्या:
त्र्यंबकेश्वर शहर अतिशय लहान असून येथे प्राचीन वाड्यांची दाट वस्ती आहे. त्यामुळे शहरात रस्ता रुंदीकरणाचा कोणताही निर्णय घेताना स्थानिक नगरपरिषदेला पूर्णपणे विश्वासात घेतले पाहिजे.


४. अतिरिक्त रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता नाही:
अमृत स्नानासाठी शहराबाहेर नवीन घाटावर पर्यायी व्यवस्था केली जात असल्याने भाविकांची मोठी गर्दी शहराबाहेरच व्यवस्थापित होईल.

 कुंभमेळा पारंपारिक पद्धतीनेच पार पडणार असल्याने शहरांतर्गत भागात अतिरिक्त रस्ते रुंदीकरण करू नये, अशी स्पष्ट भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.

वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी सूचनेची मागणी:
दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी वीज वितरण कंपनीला वारंवार वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे.

 यासंदर्भात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वीज घालवण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी पूर्वसूचना देण्यात यावी, अशी विशेष मागणी नगरसेविका कल्पना लहांगे यांनी यावेळी केली.


या निवेदनावर नगराध्यक्ष त्रिवेणी सोमनाथ तुंगार, उपनगराध्यक्ष सौ. पल्लवी शिरसाठ, गटनेते प्रशांत गायधनी, नितीन रामायणे, तसेच नगरसेविका वेदिका पाटणकर, लीला कोरडे, जयश्री उजे, संध्या देवरे, कल्पना लहांगे, आरती लोखंडे (आडके), मंजू वारूनसे, पूजा खाटीकडे, आणि नगरसेवक अमोल कडल, रंगनाथ जाधव, कुणाल उगले, रत्नप्रभा कदम यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविकांच्या सह्या आहेत.

 

Comments

No comments yet.