अरेरे.. दुष्काळातही लाचखोरांची हाव सुटेना... यासाठी शेतकऱ्याकडून मागितले १५००... एसीबीने असे अडकवले जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 09-Oct-2026

 

 

धुळे (प्रतिनिधी), ९ ऑक्टोबर २०२६ -

शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला वनहक्काचा ‘जे-फॉर्म’ (J-Form) देण्यासाठी प्रति अर्ज १०० रुपये लाच उकळणाऱ्या सांगवी वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.

राहुल रामदास बहिरम (वय ३० वर्षे, रा. सांगवी, मूळ रा. धवळीविहीर, ता. साक्री) असे लाचखोर वनरक्षकाचे नाव असून, त्याच्या या कृत्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

दुष्काळनिधीसाठी आवश्यक होता ‘जे-फॉर्म’

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांना उदरनिर्वाहासाठी वन विभागाकडून राखीव शेतजमीन मिळाली आहे. शासनाकडून शिरपूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याने, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय दुष्काळ निधी मिळणे अपेक्षित होते.

या निधीच्या लाभासाठी वनहक्काचा अधिकृत दस्तऐवज असलेला 'जे-फॉर्म' जोडणे बंधनकारक होते. याकरिता तक्रारदाराने स्वतःच्या वडिलांसह वकवाड गावातील इतर १४ शेतकऱ्यांचे असे एकूण १५ अर्ज सांगवी वन परिक्षेत्र कार्यालयात जमा केले होते.

प्रति अर्ज १०० रुपयांची मागणी

दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रारदार या अर्जांच्या पाठपुराव्यासाठी आणि 'जे-फॉर्म' मिळवण्यासाठी सांगवी येथील वन कार्यालयात गेले. तेथे कर्तव्यावर असलेले वनरक्षक राहुल बहिरम यांनी तक्रारदाराकडे १५ शेतकऱ्यांचे जे-फॉर्म देण्यासाठी प्रति अर्ज १०० रुपये याप्रमाणे एकूण १५०० रुपयांच्या लाचेची उघड मागणी केली. संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवरही डल्ला मारण्याचा हा प्रकार समोर आल्याने तक्रारदाराने लाच न देण्याचा निर्णय घेतला आणि धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर धाव घेत तक्रार नोंदवली.

Advertisement

पडताळणीअंती सापळा रचून रंगेहाथ कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची दखल घेत ८ ऑक्टोबर रोजीच पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान आरोपी राहुल बहिरम याने तक्रारदाराकडून १५ जे-फॉर्मचे १५०० रुपये लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने कार्यालयात सापळा कारवाई (ट्रॅप) आयोजित केली. तक्रारदाराकडून १५०० रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वतः स्वीकारताना वनरक्षक राहुल बहिरम याला दबा धरून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडले.

गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

लाचखोर वनरक्षक राहुल बहिरम याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पडली.

 या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी केले, तर सापळा पथकात सहाय्यक फौजदार राजन कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश अहिरे, मकरंद पाटील आणि रामदास बारेला यांनी सहभाग घेतला.

नागरिकांना एसीबीचे आवाहन:

शासकीय कामासाठी कोणताही लोकसेवक किंवा अधिकारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले आहे.

 * धुळे कार्यालय संपर्क: ०२५६२-२३४०२० / टोल फ्री क्र. १०६४ / व्हॉट्सॲप: ७७९८१६१०६४

 * ईमेल: dyspacbdhule@gmail.com

Comments

No comments yet.