नवापूर (प्रतिनिधी) ९ ऑक्टोबर २०२६ -
जीएसटीच्या दंडात्मक नोटिसा निकाली काढण्यासाठी तसेच वार्षिक विवरणपत्राच्या कारणे दाखवा नोटीसमध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात व्यापाऱ्याकडे ५० हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार येथील राज्य कर अधिकारी (वर्ग-२) आणि राज्य कर निरीक्षक (वर्ग-२) या दोघांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नवापूर येथे रंगेहाथ पकडले आहे.
संदिप देवराम पाटील (वय ४५, राज्य कर अधिकारी) आणि विवेक विश्वनाथ घोडके (वय ३७, राज्य कर निरीक्षक) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे असून, या कारवाईमुळे व्यापारी वर्तुळात तसेच कर विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार हे नवापूर येथील ३३ वर्षीय व्यावसायिक असून त्यांचे स्टील व सिमेंट विक्रीचे दुकान आहे. ते नियमित जीएसटीचा भरणा करतात. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात त्यांनी भरलेल्या जीएसटीच्या पडताळणीअंती काही तफावत आढळल्याने वस्तू व सेवा कर कार्यालय, नंदुरबार यांच्याकडून त्यांना दंडाच्या दोन वेगवेगळ्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
तक्रारदाराने सीएकडून या नोटिसांचे रीतसर उत्तरही सादर केले होते. याशिवाय, २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांचे जीएसटी वार्षिक विवरणपत्र न भरल्याप्रकरणी त्यांना आणखी कारणे दाखवा नोटिसा प्राप्त झाल्या होत्या.
१ लाखांची मागणी, तडजोडीअंती ५० हजारांवर शिक्कामोर्तब
या नोटिसा निकाली काढण्यासाठी आणि व्यापाऱ्याला मदत करण्याच्या मोबदल्यात राज्य कर निरीक्षक विवेक घोडके यांनी तक्रारदाराकडे तब्बल १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत लेखी तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने नवापूर येथे धाव घेतली. नवापूर येथील 'हॉटेल स्वस्तिक' येथे पंचांसमक्ष झालेल्या बैठकीत संदिप पाटील व विवेक घोडके यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ६० हजार रुपये मागितले, तर तडजोडीअंती ५० हजार रुपये लाच तत्काळ स्वीकारण्याचे मान्य केले.
सुरत-धुळे महामार्गावर रचला सापळा
लाचेची मागणी निश्चित झाल्यानंतर नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचला. संशयित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील 'हॉटेल उर्वीशा' (नवापूर) येथे बोलावले.
तेथे पंचांच्या उपस्थितीत राज्य कर अधिकारी संदिप पाटील यांच्या संमतीने व समक्ष राज्य कर निरीक्षक विवेक घोडके यांनी ५० हजार रुपयांची रोकड स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी संदिप पाटील आणि विवेक घोडके या दोघा लोकसेवकांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईचे नेतृत्व सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांनी केले, तर पर्यवेक्षण वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी केले. पथकात पोलीस हवालदार गणेश निंबाळकर आणि नितीन नेटारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी अथवा कर सवलत-प्रक्रियेसाठी लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
* नाशिक एसीबी कार्यालय संपर्क: ०२५३-२५७८२३०
* व्हॉट्सॲप / मोबाइल: ९५४५०३१०६४
* ई-मेल: acbspnasik@mahapolice.gov.in