चुंचाळे शिवारात बोअरवेलचे केमिकलयुक्त पाणी... नाशिक महापालिकेने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 08-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ८ ऑक्टोबर - सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २७ मधील अंबड एमआयडीसी लगत असलेल्या दत्तनगर, चुंचाळे शिवारात बोअरवेल आणि हातपंपातून पिवळसर दुषित पाणी येत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, लोकप्रतिनिधी आणि नाशिक महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज (८ ऑक्टोबर) प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दूषित पाण्यामुळे नागरिकांना त्वचेचे विकार उद्भवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

एमआयडीसीतील प्लेटिंग उद्योगांमुळे पाण्याचे स्त्रोत दूषित

चुंचाळे शिवारात मोठ्या प्रमाणावर कामगार आणि भाडेकरू वर्ग वास्तव्यास आहे. या परिसरातील बोअरवेल आणि हातपंपातून पिवळे दुषित पाणी येत असल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मनपाच्या पाईपलाईनची तपासणी केली असता पाईपलाईनचे पाणी स्वच्छ असल्याचे आढळले. मात्र, स्थानिक बोअरवेल आणि विहिरींच्या पाहणीत अंबड एमआयडीसीतील 'प्लेटिंग' उद्योगांचे रसायनयुक्त दूषित पाणी जमिनीत झिरपून विहिरी व हातपंपात उतरल्याचे स्पष्ट झाले. या दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्वचेचे गंभीर विकार जडले आहेत.

पाहणी दौऱ्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नाशिक पश्चिमच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, देवळालीच्या आमदार सरोज आहिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी एकत्रितपणे दत्तनगर परिसरात पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

पालकमंत्र्यांचे महापालिकेला महत्त्वाचे निर्देश:

दूषित पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खालील तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत:

Advertisement

१. बोअरवेलच्या वापरावर बंदी: परिसरातील रहिवाशांनी हातपंप किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व दैनंदिन कामासाठी अजिबात करू नये.

२. योग्य आकारमानाच्या नळ जोडण्या: ज्या भागात दूषित पाणीपुरवठा आहे, तेथील महापालिकेच्या नळ जोडण्या कमी आकारमानाच्या आहेत. तेथे सदनिकांच्या (फ्लॅट्स) संख्येनुसार योग्य आकारमानाच्या नवीन नळ जोडण्या तातडीने देण्यात याव्यात.

३. टँकरच्या संख्येत वाढ: बाधित भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकरच्या फेऱ्या आणि संख्या त्वरित वाढवण्यात यावी.

४. पाण्याच्या टाक्यांची सोय: मोठ्या सोसायट्यांमध्ये महापालिकेमार्फत २ ते ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात याव्यात आणि टँकरद्वारे त्या नियमित भरून देण्यात याव्यात.

महापालिकेकडून अंमलबजावणी सुरू

पालकमंत्री महाजन यांनी दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली असून, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पाणीपुरवठा) विभाग युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे.

 

Comments

No comments yet.