नाशिक, (प्रतिनिधी) ८ ऑक्टोबर - आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दर्शन पथ, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, गोदावरी नदी, कुशावर्त तीर्थ तसेच नव्याने उभारण्यात येत असलेल्या तालुका मध्यवर्ती इमारतीच्या कामांची पाहणी केली. सर्व विकासकामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
भाविकांची सुरक्षितता आणि गर्दीचे नियोजन महत्त्वाचे
पाहणीनंतर बोलताना पालकमंत्री म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देश-विदेशातून लाखो भाविक, साधू-संत, महंत आणि विविध आखाडे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतील. ही संभाव्य गर्दी विचारात घेता भाविकांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचे सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू देऊ नये." विशेषतः कुशावर्त तीर्थ आणि नगर प्रदक्षिणा मार्गावर गर्दीचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कामे जलद पूर्ण करण्यासाठी मंदिर काही काळ बंद ठेवण्याचा प्रस्ताव
मंदिर परिसरात सुरू असलेली कामे भाविकांच्या प्रचंड वर्दळीमुळे पूर्ण करणे अडचणीचे ठरत आहे. यावर तोडगा म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर काही कालावधीसाठी भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याबाबत मंदिर विश्वस्त मंडळाशी चर्चा करण्यात आली आहे. या कालावधीत मंदिरातील नित्य पूजा-अर्चा सुरळीत सुरू राहील, मात्र दर्शन बंद ठेवून दिवस-रात्र (२४ तास) कामे पूर्ण केली जातील. अंतिम तारीख विश्वस्त मंडळाच्या निर्णयानंतर जाहीर केली जाईल आणि भाविकांना याची पूर्वसूचना दिली जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विकासकामांमध्ये गुणवत्तेशी तडजोड नको
सध्या त्र्यंबकेश्वर परिसरात दर्शन पथ, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अतिक्रमणे हटवणे, नाले बांधणे, विद्युत व्यवस्था, घाटांची उभारणी आणि फरशी बदलणे यांसारखी कामे वेगाने सुरू आहेत. याशिवाय तालुका मध्यवर्ती इमारतीचे बांधकाम वेळेत आणि उत्तम गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले.
शहरात स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर भर
त्र्यंबकेश्वर शहरासह दर्शन पथ, गोदावरी नदी, कुशावर्त आणि प्रमुख रस्त्यांवर नियमित स्वच्छता, पुरेसा पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ध्वजारोहणासाठी उपलब्ध कालावधी लक्षात घेऊन प्रत्येक विभागाने वेळेचे नियोजन करावे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामांचा नियमित आढावा घ्यावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
पाहणी दौऱ्यातील प्रमुख उपस्थिती:
या पाहणी दौऱ्यात आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, एमएसआयडीसीच्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार, तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.