अंबडमधील विषारी पाणी येत असलेल्या घरोघरी भेट... संतप्त गिरीश महाजनांनी अधिकाऱ्यांची अशी काढली खरडपट्टी... दिले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 08-Oct-2026

 

 

नाशिक (प्रतिनिधी), ८ ऑक्टोबर २०२६ -

अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील दत्तनगर, मारुती संकुल, तुळजाभवानी परिसर आणि लगतच्या भागातील दूषित पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तीव्र दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी थेट घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. नागरिकांच्या थेट भेटी घेत त्यांनी व्यथा जाणून घेतल्या आणि ‘नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करा, प्रसंगी त्या तत्काळ बंद करा’, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.

घराघरांत जाऊन जाणून घेतल्या समस्या

पालकमंत्री महाजन यांनी दत्तनगर आणि मारुती संकुल परिसरातील घराघरांत जाऊन रहिवाशांची भेट घेतली. परिसरातील पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असून, ते पिवळसर व दूषित असल्याने अनेकांना त्वचेचे आजार आणि पोटाचे विकार जडल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या.

लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पाहून मंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. निष्काळजीपणा करणाऱ्या कोणत्याही उद्योगाला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली.

हातपंप, कुपनलिका सील करण्याचे आदेश; पालिकेचे पाणी पुरवणार

दूषित पाण्याचा दैनंदिन वापर त्वरित रोखण्यासाठी प्रभावित भागातील सर्व हातपंप आणि कुपनलिका तातडीने सील करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या भागात नागरी जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी नाशिक महानगरपालिकेने त्वरित मुबलक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकर व जलवाहिन्यांद्वारे सुरू करावा, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.

Advertisement

मंत्रालयीन पातळीवर हालचाली; मंत्र्यांशी थेट संवाद

या संवेदनशील प्रश्नावर मंत्र्यांनी तातडीने मंत्रालयीन पातळीवर संपर्क साधला. त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करून अंबडमधील परिस्थितीची माहिती दिली.

तसेच उद्योग विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) प्रधान सचिवांना तत्काळ संयुक्त चौकशी करून दोषी घटकांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. औद्योगिक सांडपाणी थेट नाल्यात किंवा जमिनीत मुरवणाऱ्या बेजबाबदार उद्योगांचा शोध घेऊन त्यांचे परवाने रद्द करण्याबाबतही प्रशासनाला स्पष्ट बजावण्यात आले.

रखडलेल्या ‘सीईटीपी’ प्रकल्पावरून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

औद्योगिक सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी अंबड येथे उभारल्या जाणाऱ्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटच्या (CETP) संथ कामावर महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांना खडे बोल सुनावले.

भूजल पातळी दूषित होत असल्याने पुढे नंदिनी व गोदावरी नदीप्रणाली धोक्यात येत आहे. त्यामुळे CETP चे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करून प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा, अन्यथा संबंधितांवर थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

कागदी घोडे नकोत, प्रत्यक्ष कृती करा

नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण यावर कोणतीही तडजोड होणार नाही, असे सांगत केवळ नोटिसा पाठवण्याचे सोपस्कार न करता प्रत्यक्ष परिणामकारक कारवाई दिसली पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली.

या पाहणी दौऱ्यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग विभाग व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि तातडीने दिलेल्या आदेशांमुळे परिसरातील त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असून, आता प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Comments

No comments yet.