नाशिक, (प्रतिनिधी) ८ ऑक्टोबर - नाशिक विभागातील महसूल प्रशासनाला अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नाशिक विभागातील सहायक महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संवर्गातील १५ पात्र कर्मचाऱ्यांना 'नायब तहसीलदार' (गट-ब, राजपत्रित) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे नाशिक विभागातील महसूल प्रशासनाचा कारभार अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.
१४ कर्मचाऱ्यांना नियमित, तर एकाला तदर्थ पदोन्नती
शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार, सन २०२५-२६ च्या निवडसूचीतून १४ मंडळ अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार नायब तहसीलदार संवर्गातील रिक्त पदांवर नियमित पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय, एका सहायक महसूल अधिकाऱ्याला माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार तदर्थ (Ad-hoc) पदोन्नती देण्यात आली आहे. या सर्व पदोन्नत अधिकाऱ्यांच्या नवीन पदस्थापनेचे (Postings) स्वतंत्र आदेश लवकरच निर्गमित केले जाणार आहेत.
पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे व तपशील:
(अ) नियमित पदोन्नती मिळालेले मंडळ अधिकारी (१४ अधिकारी):
१. सुनिल भाऊसाहेब लवांडे (ज्येष्ठता क्र. १३१७) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
२. गजेंद्र नारायण शेलकर (ज्येष्ठता क्र. १४४५) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
३. वसंत मुरलीधर शिरसाठ (ज्येष्ठता क्र. १४५७) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
४. सुरेश सिताराम पाटील (ज्येष्ठता क्र. १४८१) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
५. उदय भिमराव निंबाळकर (ज्येष्ठता क्र. १४९२) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
६. चंद्रकांत देविदास वानखेडे (ज्येष्ठता क्र. १४९७) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
७. ज्ञानेश्वर राघो पाटील (ज्येष्ठता क्र. १४९९) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
८. संजय लक्ष्मण साळुंखे (ज्येष्ठता क्र. १२८५) - दि. २५/०५/२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
९. मोहन केदू गायकवाड (ज्येष्ठता क्र. १५१७) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
१०. गिरीश दिगंबर कुलकर्णी (ज्येष्ठता क्र. १५१९) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
११. उदेसिंग खाजा पावरा (ज्येष्ठता क्र. १५२०) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
१२. विजय वाल्मिक हिरे (ज्येष्ठता क्र. १५२९) - सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
१३. परमेश्वर कौतिक धनगर (ज्येष्ठता क्र. १४६०) - दि. २५/०५/२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
१४. मनोहर गांगुर्डे (ज्येष्ठता क्र. १४५८) - दि. २५/०५/२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीस पात्र
(आ) तदर्थ पदोन्नती मिळालेले सहायक महसूल अधिकारी (१ अधिकारी):
१. नानासाहेब पांडुरंग बांडे (ज्येष्ठता क्र. १५५२-अ) - न्यायालयीन आदेशास अनुसरून तदर्थ पदोन्नतीस पात्र
पारदर्शक व सेवाज्येष्ठतेवर आधारित प्रक्रिया
सदर पदोन्नती प्रक्रिया राबवताना महसूल विभागाने अत्यंत पारदर्शकता बाळगली आहे. पदोन्नती देताना अंतिम ज्येष्ठतासूचीचा कसून आढावा घेण्यात आला असून, कोणत्याही वरिष्ठ कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही किंवा त्यांना डावलले जाणार नाही याची पूर्ण खात्री करण्यात आली आहे. तसेच, या पदोन्नती न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात आल्या असून त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत, त्यामुळे यातून थेट नियमित पदोन्नतीचा कोणताही कायमस्वरूपी हक्क मिळणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
"कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल आणि कामकाजाला गती मिळेल" - महसूल मंत्री
या निर्णयाबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्त्वाचा कणा आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार व सेवेनुसार वेळेवर पदोन्नतीची संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. नाशिक विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याने त्यांच्यात नवा उत्साह निर्माण होईल. नायब तहसीलदार पदांवरील या नव्या नियुक्त्यांमुळे सामान्य नागरिकांची महसुली कामे अधिक वेगाने आणि विनाविलंब पूर्ण होण्यास मोठी मदत होईल."
नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळाल्याबद्दल नाशिक विभागातील महसूल कर्मचारी संघटनेने आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पदोन्नत अधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.