शाळेचे कुलूप तोडले... जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न... नाशकातील धक्कादायक प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 08-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ८ ऑक्टोबर - शरणपूर येथील 'संत अंद्रिया प्राथमिक शाळेचे' कुलूप तोडून शाळेच्या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणून शिक्षकांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिघांसह इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरणपूर येथील 'नाशिक डायओसेशन कौन्सिल' संस्था संचलित संत अंद्रिया प्राथमिक शाळेत दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:०० ते ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी प्रतीक्षा तिडके, मालती घोडेराव, आबा पाटील आणि त्यांच्या इतर साथीदारांनी आपापसांत संगनमत करून शाळेचे कुलूप तोडले व तेथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

यादरम्यान संशयितांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर सहकारी शिक्षकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली, तसेच मुख्याध्यापकांच्या शासकीय कामात थेट अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका भावना पिटर जवाळे (वय ५२, रा. व्हाईट लिली, विधातेनगर, वडाळागाव शिवार, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित प्रतीक्षा तिडके, मालती घोडेराव, आबा पाटील व इतर दोघांवर गुन्हा रजि. नं. २७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १३२, ३२४(२), ३२९(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) उमाप करत आहेत.

 

Comments

No comments yet.