मुंबई, (प्रतिनिधी) ७ ऑक्टोबर - मालेगाव शहरातील नागरिकांसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मालेगाव महानगरपालिका हद्दीतील सोयगाव परिसरात भव्य उद्यान आणि सुसज्ज क्रीडांगण उभारण्यासाठी ०.५७ हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मालेगावकरांना खेळासाठी आणि मनोरंजनासाठी हक्काची जागा मिळणार आहे.
गट क्रमांक १५८ मधील जागेचा लोकहितासाठी वापर
सोयगाव येथील गट क्रमांक १५८ मधील एकूण १.१८ हेक्टर शासकीय जमिनीपैकी ०.५७ हेक्टर जमीन या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील लहान मुले, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांची गेल्या अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे.
शासनाच्या कडक अटी व शर्ती
जमीन मंजूर करताना शासनाने काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती घातल्या आहेत:
हस्तांतरित करण्यात आलेल्या या जागेचा वापर केवळ उद्यान आणि क्रीडांगणासाठीच करणे बंधनकारक राहील.
जागा ताब्यात मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी लागणार आहे, जेणेकरून नागरिकांना लवकर सुविधा उपलब्ध होईल.
नागरिकांचे आरोग्य आणि हिरवाईला प्राधान्य: महसूल मंत्री
या निर्णयाबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "शहरी भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा मिळणे, लहान मुलांना आणि खेळाडूंना मोकळा श्वास घेता यावा यासाठी खेळाची मैदाने उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. शहरांमध्ये हिरवाई वाढवून पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. उपलब्ध शासकीय जमिनीचा थेट लोकहितासाठी योग्य वापर करण्याला आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे."
शासनाच्या या निर्णयामुळे सोयगावसह संपूर्ण मालेगाव शहरात आनंदाचे वातावरण असून, लवकरात लवकर या क्रीडांगण व उद्यानाचे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा मालेगावकर व्यक्त करत आहेत.