जळगाव, (प्रतिनिधी) ७ ऑक्टोबर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक गतिमान, पारदर्शक आणि सदोषरहित पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला असून, जुन्या एम-२ मॉडेलऐवजी अत्याधुनिक ‘एस-३’ (S-3) नवीन ईव्हीएम मॉडेलचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ६० हजार कंट्रोल युनिट (CU) आणि १ लाख २० हजार बॅलेट युनिट (BU) नव्याने खरेदी करण्यात आले आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
जळगाव येथील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात हैदराबादच्या मे. ईसीआयएल (ECIL) कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एस-३ ईव्हीएम प्रात्यक्षिक आणि ‘ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टीम’ (EMS) सॉफ्टवेअरबाबत विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, राज्य निवडणूक आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी अतुल जाधव, उपजिल्हाधिकारी विजय कुमार ढगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि निवडणूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आयआयटी आणि नामांकित संस्थांकडून निर्मिती
नवीन एस-३ ईव्हीएमच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, आयआयटी मुंबई, आयआयएससी बेंगळुरू यांसारख्या देशातील नामांकित तांत्रिक संस्थांच्या 'टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी'ने या मॉडेलची रचना केली आहे. यात मल्टि-पोस्ट व मल्टि-व्होटिंगची सुविधा असून, भविष्यातील कायदेशीर व तांत्रिक गरजांनुसार बदल हाताळण्याची मोठी क्षमता या यंत्रात आहे. या ईव्हीएममध्ये १० हजार मतदान नोंदवण्याची आणि २ हजार मतदारांची मते सुरक्षित ठेवण्याची क्षमता आहे.
एस-३ ईव्हीएम मॉडेलची प्रमुख वैशिष्ट्ये:
* उच्च दर्जाची सुरक्षा: ओएलईडी (OLED) डिस्प्ले, सिक्युअर मेमरी मॉड्यूल, युनिक सिरियल नंबर आणि क्यूआर (QR) कोड यांसारख्या आधुनिक सुरक्षा यंत्रणा.
* अधिक बॅलेट युनिट्सची जोडणी: एका कंट्रोल युनिटला तब्बल १६ बॅलेट युनिट्स जोडता येणार असल्याने उमेदवारांची संख्या जास्त असल्यास प्रक्रिया सोपी होईल.
* अचूक नोंदणी: अंक, अक्षरे आणि हायफनचा वापर करून वॉर्ड व बूथ क्रमांक अत्यंत अचूकपणे नोंदवण्याची सुविधा.
प्रशिक्षण गांभीर्याने घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले. "ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चुरस मोठी असल्याने कोणतीही तांत्रिक चूक परवडणारी नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशिक्षणादरम्यान ईसीआयएल कंपनीचे तांत्रिक व्यवस्थापक शैलेंद्रकुमार सिंह यांनी पीपीटी आणि प्रात्यक्षिकाद्वारे एम-२ व एस-३ ईव्हीएममधील फरक, नवीन सॉफ्टवेअर आणि तांत्रिक अडचणींवरील उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.